दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑक्टोबर २०२४ | फलटण | महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. या पार्श्वभूमीवर फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतल्यास येथे राजे गट विरुद्ध खासदार गट अशी दुरंगी लढत होणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
शरद पवारांचा ‘गजर’ होणार
नुकताच आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे व श्रीमंत संजीवराजे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राजेगटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात पर्यायाने महविकास आघाडीत प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदाच्या प्रचारात माजी केंद्रीय कृषी मंत्री, खासदार शरदचंद्र पवार यांनी आपल्याला म्हणजेच फलटणला किती आणि कशी मदत केली, हे पटवून देण्यात राजेगटाचे नेतृत्व मागे राहणार नाही. तर दुसरीकडे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे देशातील आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या अशा फळीत असतात जी फळी शरद पवारांना सतत विरोध करत आली आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री, खासदार शरदचंद्र पवारांनी फलटणवर देखील कसा अन्याय केला, हे पटवून देण्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर कुठे कमी पडतील असे वाटत नाही. परिणामी यंदाच्या निवडणुकीत शरद पवार नावाचा ‘गजर’ दोन्ही बाजूंनी होताना दिसणार आहे.
श्रीमंत रामराजे ठरणार राजेगटासाठी अदृश्य शक्ती
शरदचंद्र पवार गटात प्रवेश करताना जाणून बुजून श्रीमंत रामराजे हे लांब राहिले. तांत्रिकदृष्ट्या श्रीमंत रामराजे हे महायुतीत असले तरी ते कोणासोबत आहेत, हे सर्वांना ठावूक आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीच्या प्रचारात देखील श्रीमंत रामराजे दिसणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेष आहे. पण, या काळात श्रीमंत रामराजे पडद्यामागून अदृश्य शक्ती बनून राजेगटासाठी भक्कम आधार ठरतील, यात शंका नाही.
खासदार गट आणि महायुती तशी ‘स्ट्राँग’; पण जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न हवेत
पूर्वी खासदार गटात नेतेमंडळी किती? असे विचारले तर काही ठराविक जणांचीच नावे समोर येत होती. पण, या लोकसभा निवडणुकीनंतर खासदार गट हा तसा ‘स्ट्राँग’ झालेला दिसत आहे. सुरवडीतून ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, दुधेबावीतून माणिकराव सोनवलकर, आळजापुर येथून विलासराव नलवडे, राजाळ्याचे विश्वासराव भोसले, विडणीचे सचिन अभंग अशी अनेक नावे खासदार गटाला जोडली गेली आहेत. जी त्यांच्या प्रत्येकाच्या गावात काही ना काही ताकद बाळगून आहेत. निवडणुकीची माहिती आणि अंदाजही या मंडळींना आहे. तसेच महायुतीतून आसू येथील श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, निंबळक येथून राम निंबाळकर ही नावेही समोर दिसत आहेत. जो विरोध गत विधानसभा निवडणुकीत राजेगटाला होता, त्यापेक्षा काही प्रमाणात ही विरोधातली टक्केवारी वाढलेली दिसते. पण, तरीही जिंकण्यासाठी महायुतीला शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत, हे निश्चित.
श्रीमंत संजीवराजेंचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’ दिसणार
संस्थात्मक राजकारणाच्या पायावर उभ्या असलेल्या राजेगटाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत या संस्थाच उपयोगी ठरणार आहेत. फलटण एज्युकेशन सोसायटी, श्रीराम सहकारी साखर कारखाना, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक तसेच गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यासारख्या अनेक संस्थांमधील कर्मचारी आणि सहकारी यांच्याशी कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध श्रीमंत संजीवराजे यांचे तयार झालेले आहेत. या कौटुंबिक जिव्हाळ्यामुळेच कुटुंब प्रमुख या नात्याने श्रीमंत संजीवराजे सांगतील, तो शब्द अंतिम म्हणून सगळे जण ऐकत असतात. याच्याच जोरावर श्रीमंत संजीवराजे ‘मायक्रो मॅनेजमेंट’ करत असतात. आणि हेच ‘मायक्रो मॅनेजमेंट’ यावेळेस सर्वांना ठळकपणे दिसून येणारं आहे.
बौद्ध समाजाबाबत भूमिका काय?
२००९ सालापासून अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षीत असलेल्या या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत बौद्ध समाजातील उमेदवाराला संधी मिळालेली नाही. यंदाच्या निवडणुकीतही राजेगटाची आणि खासदार गटाची भूमिका बौद्ध समाजातील उमेदवार देण्याची नाही, हे स्पष्ट दिसत आहे. एकीकडे दीपक चव्हाण तर दुसरीकडे सचिन कांबळे-पाटील यांची नावे अंतिम झाल्याची चिन्हे दिसत आहेत. जर यंदा पुन्हा बौद्ध समाजाला डावलले गेले तर बौद्ध समाजाची भूमिका काय राहणार? याची उत्कंठा सर्वांना लागलेली आहे. प्रचारावर, मतदानावर बहिष्कार की आपला स्वतंत्र उमेदवार दोन बलाढ्य गटासमोर उभा करण्यासाठी बौद्ध समाज पुढे येणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.