पुढील वर्षी नियोजित जी-२० परिषदेच्या आयोजनासंदर्भात आढावा बैठक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ नोव्हेंबर २०२२ । पुणे । पुणे येथे पुढील वर्षी जून 2023 मध्ये होणाऱ्या जी-२० राष्ट्रांच्या परिषदेबाबत पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सहसचिव अमितेश कुमार सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन येथे बैठक घेण्यात आली.

बैठकीस पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अवर सचिव सोमकुवर, वैज्ञानिक अतिफ खान, आर.आर. तिवारी, व्यवस्थापक अनुज कौशल आदी उपस्थित होते.

जी-२० राष्ट्रसमुहाच्या परिषदेचे आयोजन भारतासह तीन देशात करण्यात आले आहे. महाराष्ट्रात मुंबईसह पुणे व औरंगाबादला या परिषदेतील सत्रांच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. या निमित्ताने भारताचे डिजिटल क्रांतीतील सामर्थ्य समृद्ध सांस्कृतिक वारसा, वैविध्य जगासमोर आणण्याची संधी मिळाली असून त्यादृष्टीने तयारी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त श्री. राव यांनी यावेळी दिली.

श्री. अमितेश कुमार यावेळी म्हणाले, परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना विमानतळ ते मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत भारत, महाराष्ट्र तसेच पुण्याची वैशिष्ट्ये ठळक दिसतील अशा पद्धतीने नियोजन करावे. देशाची प्रतिमा या परिषदेच्या आयोजनातून अधिक उंचावण्याची संधी मिळत असल्याने त्यादृष्टीने तयारी करावी.

पुण्यातील ऐतिहासिक महत्त्वाची वारसा ठिकाणे, मानाचे गणपती, शैक्षणिक ठिकाणे, उद्योग आदी ठिकाणी परिषदेतील प्रतिनिधींच्या भेटींचे नियोजन करण्यात येईल. शहरातील सौंदर्यीकरण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील. देश, राज्य तसेच पुणे जिल्ह्याबाबत माहितीच्या लघुचित्रफीती, कला, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.

बैठकीस महसूल विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पर्यटन विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, उद्योग विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, आरोग्य, महसूल, परिवहन विभाग आदींचे विभागस्तरीय वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!