
स्थैर्य, वावरहिरे, दि.१२: माण तालुक्यातील उत्तरेकडील भागातील वावरहिरे,दानवलेवाडी,डंगिरेवाडी, राणंद थदाळे,मोही ,शिंगणापुर परिसरात शनिवार,रविवार सलग झालेल्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपुन काढले. कायम दुष्काळी परिस्थितीशी सामना कराव्या लागणार्या या भागात मागील एक दोन वर्षात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे येथील परिस्थिती बदलु लागल्याचे चिञ पाहायला मिळत आहे. त्यात या वर्षी वरुणराजाची ही या भागाला कृपादृष्टी लाभली. या भागात मागील पंधरापुर्वी सतत झालेल्या सततच्या पावसामुळे या भागातील बहुतांश जलसाठे आदिच तुंडुंब भरले होते.त्यानंतर पंधरा दिवस पावसाने उघडीप दिली. शेतकरी खरिप पिके काढणीत व्यस्त होता.परंतु अचानक शनिवार ,रविवार सलग झालेल्या परतीच्या पावसाने या भागाला पुन्हा एकदा झोडपुन काढले. सकाळी कडक ऊन अन दुपारपासुन झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील ओढे ,नाले ,छोटे मोठे बंधारे तुडुंब भरुन ओसाडुंन वाहु लागलेत.अचानक आलेल्या या पावसाने शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात धांदल उडाली.सर्वञ पाणी पाणी झाले. काही ठिकाणी पिके हातातोंडाशी आली असताना तर काहिंची मळणी व काढणी सुरु असतानाच परतीच्या पावसाने हाहाकार माजवला.काही ठिकाणी तर बाजरीची कणसे शेतातच असताना या अचानक आलेल्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला तर काही ठिकाणी बाजरीचे पीक जमिनीवर पुर्णता झोपले आहेत. कापणी केलेली बाजरीची कणसे पुन्हा मातीत गेली आहेत.शेतात पाणी साठल्याने काही भागातील ताली व बांध खचुन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तर काही ठिकाणी कांदा,बाजरी,भुईमुग,घेवडा पिके पाण्यात गेल्याने बळीराजा हवालदिल झाला.