क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पुर्णाकृती पुतळा व फलटणकरांची कृतज्ञता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑगस्ट २०२२ । फलटण । स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील क्रांतिसिंह नाना पाटील व सातारा जिल्ह्याचे संबंध हे सर्वांना ज्ञात आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात साताऱ्यातील अनेक गावातून कधी भूमिगत राहून व कधी उघड होऊन क्रांतिकार्य केले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात तर शेतकरी , शेतमजूर , कष्टकरी , कामगार यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आहेत.

सातारा जिल्ह्यातील अनेक गावे आहेत की त्या गावातून आपले वास्तव्य क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केले होते. साताऱ्यात तर स्मृतीशेष कॉ वसंतराव आंबेकर , स्मृतीशेष माजी आमदार कॉ व्ही.एन. पाटील , स्मृतीशेष कॉ नारायणराव माने , स्मृतीशेष कॉ वसंतराव आंबेकर यांच्या घरात ते कायम राहत असत. क्रांतिसिंह नाना पाटील हे सातारा लोकसभा निवडणुकीसाठी उभे असताना मतदार यादीत कॉ वसंतराव आंबेकर यांच्याच साताऱ्यातील घराचा पत्ता क्रांतिसिंह नाना पाटील यांचा होता. फलटण तालुक्यातील साखरवाडी येथील खंडकरी शेतकऱ्यांचा लढा हा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली लढला गेला.यामध्ये कॉ माधवराव गायकवाड , कॉ शेख काका दादा नलावडे , कॉ हरिभाऊ निंबाळकर , कॉ रजनीकांत किर्वे , रामभाऊ सस्ते , बबनराव अडसूळ अशी कितीतरी नावे घेता येतील की त्यांनी खंडकरी शेतकऱ्यांच्या लढ्यात योगदान दिले आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील यांचा देशातील पहिला पूर्णाकृती पुतळा फलटण येथे आज दिमाखात फलटण -पंढरपूर रस्त्यावर उभा आहे याचे सर्व श्रेय फलटण तालुक्यात डावी चळवळ वाढवणारांचे आहे.

आपल्या या नेत्याचा फलटण तालुक्यामध्ये पुतळा व्हावा यासाठी फलटण तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आणि क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा स्मारक समिती स्थापन केली. क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष शिवाजीराव बंडोबा जाधव होते. सरचिटणीस म्हणून हणमंतराव दिनकरराव पवार होते आणि खजिनदार म्हणून हरिभाऊ अण्णासाहेब डेंगे होते. पुतळा स्मारक समितीचे सदस्य म्हणून के बी तथा बबनराव अडसूळ , सुभाषराव शिंदे , विजयराव बोरावके ,जे.एच गरवालिया ( मिस्त्री) , जया कुकरा शेट्टी , पत्रकार रवींद्र बेडकिहाळ आणि तुकाराम कृष्णाजी पिसाळ यांनी काम पाहिले होते. या सर्वांनी मिळून क्रांतिसिंह नाना पाटील यांचा देशातील पहिला पूर्णाकृती पुतळा फलटण येथे उभा केला. त्याला फलटण तालुक्यातील खंडकरी शेतकरी , साखर कामगार , यांनी मोलाचे सहकार्य केले. याबद्दल खरे तर या सर्वांचे ऋणीच राहिले पाहिजे.

स्मारक समिती केवळ घोषणा करून थांबली नाही तर पुतळा उभा करून खऱ्या अर्थाने स्मारक उभे केलेले आहे. हा पुतळा उभा करताना नाना पाटील यांच्या येडेमच्छिंद्र येथील भगिनी त्याचबरोबर कराडचे स्मृतीशेष आमदार पी डी पाटिल यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले व नाना पाटील यांचा पुतळा उभा करताना त्यांचा चेहरा कसा असावा , शरिरयष्टी कशी असावी या संदर्भात मोलाची माहिती दिली असे या समितीचे सदस्य असलेले रवींद्र बेडकिहाळ यांनी सांगितले. सुप्रसिद्ध शिल्पकार बी आर खेडकर यांनी अतिशय रुबाबदार व योग्य असा पुतळा बनवला आहे. त्याचबरोबर पुण्याचे सुभाष चिंबळकर हे आर्किटेक्ट होते आणि माधवराव हिंगे यांनी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम पाहिले. महाराष्ट्राचे गृह व पाटबंधारे खात्याचे तत्कालीन राज्यमंत्री व सातारच्या राजघराण्यातील स्मृतीशेष अभयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते या पुतळ्याच्या जागेचा भूमिपूजन समारंभ २७ जून १९८१ रोजी झाला आणि त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ दि १५ जानेवारी १९८२ रोजी फलटणचे माजी आमदार व कामगार नेते , जेष्ठ पत्रकार शिवसंदेशकार हरिभाऊ निंबाळकर यांच्या हस्ते व के बी तथा बबनराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कामगार नेते कॉ मधुकरराव भिसे होते. हजारो शेतकरी , कामगार यांच्या उपस्थितीत हा पुतळा अनावरण समारंभ झालेला आहे.

या पुतळा अनावरणाच्या निमित्ताने सुरेख व माहितीपूर्ण अशी स्मरणिका प्रकाशित करण्यात आलेली आहे. या स्मरणिकेचे संपादन ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनी केलेले आहे.

हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच की क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याप्रती कृतज्ञतेचा भाव म्हणून हा पुतळा आजही तेथे उभा आहे. मध्यंतरी हा पुतळा रस्ता रुंदीकरणात हटवण्याबाबत चर्चा चालू झाली. त्यावेळी फलटणकरांनी तो पुतळा हलवू दिला नाही. यातच क्रांतिसिंहांबद्दल फलटणकरांमध्ये किती जिव्हाळ्याचा भाव आहे हे दिसून आले. सातारा जिल्ह्यातही क्रांतिसिंह नाना पाटील यांचा इतरत्र कोठेही असा पूर्णाकृती पुतळा नाही. मात्र फलटणकर यांनी तो उभा करून क्रांतिसिंह यांच्या पोटी असलेले प्रेमच व्यक्त केले आहे. अशा या क्रांतीसिंहांना जयंतीनिमित्त क्रांतिकारक अभिवादन.

विजय मांडके
सातारा
9822653558


Back to top button
Don`t copy text!