दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२२ । पाटण । पाटण तालुक्यातील करपेवाडी येथे तीन वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा खून करण्यात आला होता. हा खून अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या तिच्या आज्जीनेच मांत्रिकाद्वारे गळा चिरून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. फूलसिंग सेवू राठोड (गळा चिरणारा) रा. ऐनापूर तांडा विजापूर, विकास उर्फ विक्रम तोळाराम राठोड, रा. नर्हेगाव, ता. हवेली, रंजना लक्ष्मण साळुंखे (आजी) रा. तळमावले, कमल आनंदा महापूरे (देवऋषिण), रा. खळे, ता. पाटण यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी, दि. 22 जानेवारी 2019 रोजी करपेवाडी ता.पाटण गावचे हद्दीत देसाई शेत नावचे शिवारात धारधार हत्याराने गळा चिरलेल्या अवस्थेत भाग्यश्री संतोष माने वय 17 वर्षे आढळली होती. याबाबत ढेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. घटनास्थळावरील तसेच परिस्थीतीजन्य पुराव्यावरुन नमुद मुलीचा खुन नरबळी करीता करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले होते.
अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक , सातारा व श्री . अजित चोर्हाडे अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून सदरचा प्रकार हा नरबळीचा असल्याने गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना विवेक लावंड, उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण विभाग पाटण व किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा , सातारा व संतोष पवार सहायक पोलीस निरीक्षक ढेबेवाडी पोलीस ठाणे यांना दिल्या. त्याप्रमाणे नमुद गुन्हा उघडकीस आणण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पाटण व ढेबेवाडी पोलीस ठाणेकडील पथके कार्यरत होती.
संतोष पवार सहायक पोलीस निरीक्षक ढेबेवाडी पोलीस ठाणे हे गुन्हयाचे तपासामध्ये तांत्रिक विश्लेषन करीत होते. त्यांना तांत्रिक विश्लेषन करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक मदत करीत होते . तपास पथकास दोन संशईत इसम गुन्हयाच्या घटनेच्यावेळी त्या परिसरामध्ये असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे तपासपथकाने त्यांना लक्ष करून त्यांच्या हलचालीवर बारकाईने लक्ष पुरविण्यास सुरुवात केली. नमुद व्यक्तींच्या हलचाली पडताळत असताना तपास पथकास सदरचे इसम हे एका मांत्रिकाच्या संपर्कात असल्याचे तसेच तो मांत्रिक गुन्हयाच्या घटनेच्यावेळी घटनास्थळाचे परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यादृष्टीने नमुद दोन इसमांचेकडे तपास पथकांनी सखोल व बारकाने विचारपुस केली असता त्यांनी गुप्तधनाच्या अमिषापोटी मांत्रिकाचे सांगण्यावरुन मयत मुलीची आजी, दोन संशईतांपैकी एक इसम व आणखी एक स्त्री ( देवऋषीन ) यांनी कट रचून संगणमताने मुलीस गुंगीचे औषध देवून, तिला उसाचे शेतात नेवून तिचा गळा चिरुन तिचा बळी दिला असल्याचे सांगीतले.
संतोष पवार, प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक , ढेबेवाडी पोलीस ठाणे यांनी देबेवाडी पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून चार्ज घेतल्यानंतर नमुद खुनाचा गुन्हा उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण विभाग यांचेकडे तपासावर प्रलंबित होता व उघडकीस आला नव्हता. सदरचा गुन्हा हा तीन वर्षापासून उघडकीस न आल्याने सहा. पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी गुन्हयाचे आवलोकन करुन, गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने विशेष प्रयत्न करुन, परिश्रम घेवून गुन्हयातील संशईत आरोपींबाबत तसेच त्यांचे हलचालीबाबत माहिती प्राप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला. त्यांचे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक, अजित बोन्हाडे अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी विशेष अभिनंदन केलेले आहे.