दैनिक स्थैर्य । दि. 17 ऑक्टोबर 2021 । फलटण । प्रसन्न रुद्रभटे । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांच्या ‘जिद्द’ या निवासस्थानी फलटण तालुक्यातील नेत्यांची मांदियाळी पहायला मिळाली. याचे निमित्त होते, जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसाठी आयोजित केलेले स्नेहभोजन. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकारणामध्ये एकमेकांचे कट्टर विरोधक असणार्यांनी सुद्धा यावेळी एकत्र येवून स्नेहभोजनाचा आस्वाद लुटला.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे – पाटील, सद्गुरु उद्योग समूहाचे शिल्पकार व माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, महानंदचे व्हाईस चेअरमन डी. के. पवार, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
साखरवाडीतील नेतेमंडळी हम साथ साथ है
साखरवाडीच्या राजकीय मैदानातील कट्टर विरोधक सुभाष शिंदे यांच्या घरी एकत्र आलेले होते. जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील यांच्यासह साखरवाडीचे माजी सरपंच विक्रम भोसले व महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार यांनी एकमेकांच्या शेजारी उभे राहून फोटोसेशनही केले. यावेळी तिघांनीही मनातल्या मनात ‘हम साथ साथ है ।’ असे तर म्हणले नसेल ना ?
विक्रमराव तात्यांच्या सोबतच राहा, पण जरा सबुरीने : डी. के. पवार
साखरवाडीचे माजी सरपंच विक्रम भोसले हे जेवणाचा आस्वाद घेत असताना प्रल्हाद साळुंखे – पाटील व महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार हे त्यांच्याजवळ आले. त्यावेळी डी. के. पवार हे विक्रम भोसले यांना ‘‘विक्रमराव, तात्यांच्या सोबत रहा, पण सबुरीनं’’ असे काही तरी सांगत असावेत, असा कयास उपस्थित मंडळी हे दृश्य पाहून लावत होती.
नगरपरिषदेसह जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची नांदी
फलटण तालुक्यामध्ये आगामी काही महिन्यांमध्ये नगरपरिषदेसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. निवडणुकीच्या काही महिने आधी जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी आयोजित केलेल्या स्नेह भोजनामुळे फलटण तालुक्यातील राजकीय वर्तुळातही विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत.