निरगुडी येथील होलार समाज वस्तीशेजारील बंधार्‍यास लागून संरक्षण भिंत लवकर बांधावी; महेंद्र गोरे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी


दैनिक स्थैर्य | दि. १२ एप्रिल २०२३ | फलटण |
निरगुडी (ता. फलटण) गावातील होलार समाज (दलित वस्ती) वस्ती शेजारील बंधार्‍यास लागून संरक्षण भिंत बांधावी, अशी मागणी निरगुडी नागरिक महेंद्र हणमंत गोरे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे एका अर्जाद्वारे केली आहे.

गोरे यांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, निरगुडी गावातील होलार समाज या दलित वस्तीशेजारी लागून साखळी बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधार्‍यामुळे दरवर्षी पावसाळ्याच्या काळात पूर परिस्थिती तयार होत असते. पाण्याचा प्रवाह दलित वस्तीच्या दिशेने असल्याने पुराचे पाणी वस्तीमध्ये घुसते. त्यावेळी नाईलाजाने तात्पुरते स्थलांतरित व्हावे लागते. नागरिकांमध्ये जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता जास्त आहे. अशा भयानक परिस्थितीत दलित होलार समाज जगत आहे.

हाच धोका लक्षात घेऊन २०१७ सालापासून ते आज अखेरपर्यंत ग्रामपंचायत निरगुडी, लघु पाटबंधारे उपविभाग फलटण, तहसील कार्यालय फलटण येथे वारंवार अर्ज, निवेदने, चर्चा केल्या आहेत; परंतु आजपर्यंत होलार समाजातील (दलित वस्तीतील) लोकांच्या पदरी निराशाच आली आहे.

ही सदर गंभीर बाब लक्षात घेऊन दलित वस्ती शेजारील बंधार्‍यास लागून संरक्षण भिंत लवकर बांधून समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी गोरे यांनी अर्जात शेवटी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!