कोयनानगर येथील नियोजित एसडीआरएफ आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्राबाबत मुख्यमंत्र्यांकडे होणार सादरीकरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ७ जुलै २०२१ । मुंबई । कोयनानगर येथे राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्र उभारण्याबाबत पुढील एका महिन्याच्या आत सविस्तर प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्याकडे सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी आज दिली.

कोयनानगर येथे नियोजित असलेल्या राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्राच्या सद्यस्थितीचा आढावा आज गृहराज्यमंत्री(ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी घेतला. हा प्रकल्प श्री. देसाई यांच्या संकल्पनेतून साकारला जाणार असून या प्रकल्पाला तातडीने मूर्त स्वरूप देण्यासाठी शासन स्तरावर भक्कमपणे पाठपुरावा त्यांनी केला आहे. या बहुउद्देशिय प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी कोयना धरण भेटी दरम्यान तत्वत: मान्यता दिली असून या प्रकल्पाचा आराखडा तयार करून तसा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रशासनाने जलद गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश श्री.देसाई यांनी यावेळी दिले.

पावसाळ्यात सांगली, सातारा आणि कोल्हापूर भागात पूर परिस्थिती निर्माण होते. त्यावेळी मदत कार्यासाठी एनडीआरएफ, पोलीस, एसआरपीएफ आदी दलांची आवश्यकता असते. हे मदत कार्य लोकांपर्यत जलदगतीने पोहोचविण्यासाठी कोयनानगर येथे नियोजित असलेले राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्र उभारण्याची गरज आहे. या भागात सर्व सोई सुविधा आहेत जागाही शासनाचीच असल्यामुळे जागेचाही अडसर दूर झाला आहे. या एसडीआरएफ आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्रासाठी ३२ हेक्टर अर्थात ८० एकर जागा उपलब्ध असून ती महसूल विभागाकडे वापरात नसलेली जागा आहे. ही जागा गृह विभागाला हस्तांतरीत होणे गरजेचे आहे. त्यासाठी गट/सर्व्हे क्रमांक २५, २६, २७ या क्षेत्रातील जमीन महसूल विभागाची आहे. ती जागा महसूल विभागाकडून गृह विभाग अथवा पोलीस महासंचालक कार्यालयाकडे हस्तांतरीत करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूल विभागाकडे सादर करावा व त्यासाठी जलदगतीने पाठपुरावा करावा, असे निर्देश श्री.देसाई यांनी सातारा पोलीस अधीक्षकांना दिले.

मंत्रालयात झालेल्या या आढावा बैठकीला अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक संजय पांण्डेय, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, सहा. पोलीस महासंचालक एस जगन्नाथन, वित्त विभागाचे सह सचिव विवेक दहीफळे, साताराचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!