
दैनिक स्थैर्य | दि. २० ऑगस्ट २०२३ | फलटण |
साहित्यिक जेव्हा संवेदनशील होतो, तेव्हा मनाचा ठाव घेणारी नवसाहित्य रचना निर्माण होते. ही साहित्य रचना दीर्घकाळ समाजमनावर अधिराज्य गाजवते व तो साहित्यिक कायम स्मरणात राहतो. कमी शब्दात व कमी वेळात जास्त आशय देऊन मनाला संवेदनशीलता, आनंद, विरह, चटका, माणुसकी, मानवता, संस्कृती, संस्कार व दीर्घकाळ टिकणारा विचार देणारा साहित्य प्रकार म्हणजे कविता. काव्य संमेलनातील कविता व शब्दफेक म्हणजे हास्याचे फवारे व श्रावण मासातील डोंगर दरीतून कोसळणार्या पावसाच्या सरी, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक व काव्य संमेलन अध्यक्ष ताराचंद्र आवळे यांनी सोळशी तालुका कोरेगाव येथे श्रावण व नीज श्रावण शनैश्वर आनंद अधिक सोहळा श्रावण मासातील विविध धार्मिक कार्यक्रम यामधील काव्य संमेलनात विचार व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर प. पू. शिवयोगी तपोनिधी नंदगिरी महाराज व निमंत्रित कवी उपस्थित होते.
ताराचंद्र आवळे पुढे म्हणाले की, कविता मनाला दीर्घकाळ आनंद देते. धकाधकीच्या जीवनात काव्याला फार महत्त्व आहे. सर्व कवींच्या कवितांनी काव्यसंमेलन उंचीवर नेऊन ठेवले, ही शब्दांची ताकद आहे. शब्दांचे सामर्थ्य ज्याला कळाले, तो कधीच एकटा असत नाही. तो सर्वात जास्त सुखी असतो.
यावेळी निमंत्रित कवी गंगाराम कुचेकर, विलास वरे, आनंदा ननावरे, विलास पिसाळ, प्रकाश सकुंडे, जयकुमार खरात, प्रा. जगन्नाथ विभूते, प्रा. अशोक माने, प्रा. दशरथ जाधव, लक्ष्मण शिंदे, अजित क्षीरसागर, अंशुमन जगदाळे, आनंदा भारमल, अनिल लोहार, पोपट कासुर्डे यांच्या विविध ढंगातील व आशयाच्या कवितांनी रसिकांची मने जिंकली व मनसोक्त टाळ्यांची दाद मिळाली.
व्यासपीठासमोर सुंदर हिरवागार परिसर, भव्य डोंगर, अधूनमधून पावसाच्या सरी, अंगाला झोंबणारा गार गार वारा, मोठ्या संख्येने शनैश्वर भक्त व काव्यरसिक यामुळे हे काव्य संमेलन अविस्मरणीय व आगळेवेगळे ठरले. ज्येष्ठ कवी ज. तु. गार्डे यांनी बहारदार शब्दांच्या षटकाराने रंगतदार सूत्रसंचालन केले.