रत्नागिरीत सागरी विद्यापीठासाठी जागा निश्चित करावी – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ जुलै २०२३ । मुंबई । रत्नागिरी जिल्ह्यात सागरी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

सिंहगड या शासकीय निवासस्थानी मंत्री श्री.पाटील यांनी रत्नागिरीतील उच्च व तंत्र शिक्षण विभागाशी संबंधित कामांविषयी आज आढावा घेतला. या बैठकीला रत्नागिरीचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग, तंत्रशिक्षण संचालक डॉ विनोद मोहितकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोकणाला मोठी सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सागरी विद्यापीठ व्हावे अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांनी केली होती. त्याअनुषंगाने आज मंत्री श्री. पाटील यांनी आढावा घेत रत्नागिरीत सागरी विद्यापीठासाठी जिल्हाधिकारी यांनी जागा निश्चित करून शासनाला प्रस्ताव सादर करावा. यासंदर्भात येत्या हिवाळी अधिवेशनात सागरी विद्यापीठ कायदा विधिमंडळात आणला जाईल, असे मंत्री श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील इतर विषयांबाबत आढावा घेताना मंत्री श्री. पाटील म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय विधी महाविद्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव पुन्हा विधी व न्याय विभागाला सादर करण्यात येईल. यासंदर्भात विधी व न्याय मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून विधी महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची मुख्य इमारत व हायड्रोलिक वर्कशॉप इमारतीचे बळकटीकरण, मुला-मुलींच्या वसतिगृहाचे बळकटीकरण आणि शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या तसेच रत्नागिरी येथे स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर स्थापन करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देखील मंत्री श्री. पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.


Back to top button
Don`t copy text!