
स्थैर्य, खंडाळा, दि.१५: खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात सोमवारी पंचवीस ते वर्षीय युवतीचा अर्धवट स्थितीत जळालेला मृतदेह आढळून आला. यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, प्रथमदर्शनी हा खुनाचा प्रकार असल्याचे दिसून येत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली.
याबाबत माहिती अशी, सोमवारी दुपारच्या सुमारास खंडाळा, ता. खंडाळा येथील घाटात एका महिलेचा अर्धवट स्थितीत जळलेला मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती देताना धीरज पाटील म्हणाले, खंडाळा, ता. खंडाळा येथील घाटाची सुरुवात होते, त्याठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारामध्ये महिलेचा अर्धवट स्थितीत जळालेला मृतदेह आढळून आला आहे. घाटातून जाताना लघुशंकेसाठी उतरलेल्या एका प्रवाशाचे लक्ष गेल्यावर हा प्रकार समोर आला.
खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे फौजफाटयासह तत्काळ घटनास्थळी हजर झाले. अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी ही घटनास्थळाला भेट दिली. या प्रकाराची माहिती देताना ते म्हणाले, या महिलेच्या हातात अंगठ्या असून डाव्या हातावर काहीतरी गोंदलेले आहे. अंगावरील कपडे जळालेल्या स्थितीत आहेत. प्रथमदर्शनी हा खुनाचा प्रकार दिसून येत असून अज्ञात इसमाच्या विरोधात खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेची ओळख पटवणे आणि घटनेतील संशयितांना शोधून काढणे हे पोलिसांपुढे आव्हान असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान, वाठार बुद्रुक, चिंचणेर वंदन येथील खुनांच्या घटनेतील आरोपींना जेरबंद केले असताना खंडाळा घाटात सलग खुनाची तिसरी घटना घडल्यामुळे खुनाच्या या मालिकेमुळे जिल्हा हादरून गेला आहे.