दैनिक स्थैर्य । दि. ०८ फेब्रुवारी २०२१ । फलटण । नीरा उजवा कालव्यास समांतर बंद नलिका प्रस्तावाबाबत सर्वेक्षण करणेची मागणी आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून मंत्री पाटील यांनी सर्वेक्षण करुन सदर योजना व्यवहार्य असेल तर प्रस्तावित करण्याचे निर्देश जलसंधारण विभागास दिले आहेत.
आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार, नीरा उजवा कालव्यावर खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर अशा ५ तालुक्यातील सुमारे २.५० लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी दिले जात आहे.
धरण क्षेत्रामध्ये पाऊस असताना किंवा धरणात पुरेसा पाणी साठा असूनही लाभ क्षेत्रातील सर्व तालुक्यांमध्ये काही वेळा पाणी टंचाईची परिस्थिती असते, तसेच धरणातून जादा होणारे पाणी पावसाळ्यात नदी वाटे सोडले जाते. काही वेळेस या भागाला पाण्याची गरज असताना कालव्याची क्षमता कमी असल्याने पाणी देता येत नाही, यासाठी नदीसह कालवा व बंद नलिकेद्वार पाणी देता येईल.
उन्हाळा हंगामामध्ये तापमान वाढल्यामुळे सदरच्या ५ तालुक्यात पिके एकाच वेळी पाण्याला येतात, धरणामध्ये पुरेसा पाणी साठा असूनही नीरा उजवा कालव्याची वहन क्षमता केवळ १५५० क्युसेक्स असल्याने आणि सिंचनाचे क्षेत्र जास्त असल्याने आवर्तनाचा कालावधी दोन ते अडीच महिने वर गेला आहे. त्यामुळे सर्व तालुक्यांना एकाच वेळी पाणी देणे शक्य होत नाही. परिणामी शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, तसेच जलसंपदा विभागावर अतिरिक्त ताण येतो, सबब नीरा उजवा कालव्यावर वीर धरणापासून तिसंगी तलावापर्यंत बंद नलिका टाकल्यास एकाच वेळी सर्व तालुक्यांना पाण्याचे वितरण होऊ शकेल ही बाब निदर्शनास आणून देत त्याबाबत तातडीने सर्वेक्षण होण्याची मागणी आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे.
समांतर बंद नलिकेची व्यवहार्यता तपासणीसाठी कालव्याच्या हेड पासून टेल पर्यंत सर्वेक्षण होणे गरजेचे असून आपल्या स्तरावरुन संबंधीतास योग्य ते आदेश व्हावेत. असे निवेदनात म्हटले आहे.
नीरा उजवा कालव्यास समांतर बंद नलिका असावी हा मुद्दा विधानसभा, लोकसभा निवडणूकीत मोठ्या प्रमाणात मतदारांपुढे मांडला गेला होता, मात्र त्यानंतर पुढे काहीच हालचाल झाली नाही, ती या निवेदनाद्वारे पुन्हा गतिमान झाली आहे.