
दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑगस्ट २०२३ | फलटण |
एच.टी. पारेख फाऊंडेशन, प्रगत शिक्षण संस्था, फलटण आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय, जि.प. सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजी एक दिवसीय बाल शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद सातारा जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात होणार आहे.
‘शैक्षणिक अखंडतेसाठी पूर्वप्राथमिक व प्राथमिक शिक्षणातील पूल’ या प्रकल्पांतर्गत प्रगत शिक्षण संस्था एच. टी. पारेख फाऊंडेशनच्या अर्थसहाय्यातून व पंचायत समिती, माणच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या सहकार्याने, नवीन शैक्षणिक धोरण २०२० चा व ‘आकार’ या राज्याच्या बालशिक्षण अभ्यासक्रमाचा आधार घेत ऑक्टोबर २०२१ पासून सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील ५० अंगणवाड्यांसोबत काम करीत आहे. गेल्या २ वर्षांत माणमध्ये पथदर्शी व पायाभूत काम झाले आहे. त्या कामाची मांडणी आपल्या सर्वांसमोर करणे, या हेतूने या एकदिवसीय बालशिक्षण परिषदेचे आयोजन केले आहे.
या बाल शिक्षण परिषदेचा एकदिवसीय कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
सकाळी १०.०० ते १०.३० नोंदणी, १०.३० ते ११.०० स्वागत आणि प्रास्ताविक, ११.०० ते १२.०० बीजभाषण, दुपारी १२.०० ते १.०० परिसंवाद : अंगणवाड्यांची क्षमता बांधणी आणि त्याचे परिणाम, दुपारी २.०० ते ३.०० भोजन, दुपारी ३.०० ते ४.०० परिसंवाद : प्रकल्पाबाहेरील अंगणवाड्यांतील काम, सायंकाळी ४.०० ते ५.०० परिसंवाद : बालशिक्षण – पूर्वप्राथमिक व प्राथमिक शिक्षणातील सेतू, सायंकाळी ५.०० ते ५.१५ समारोप आणि आभार.
या बाल शिक्षण परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ज्ञानेश्वर खिलारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रोहिणी ढवळे, एच.टी.पी. एफ एज्युकेशन कन्सलटंट उज्ज्वल बॅनर्जी, बालशिक्षण तज्ज्ञ डॉ. नीलिमा गोखले या उपस्थित राहणार आहेत. तसेच भाषातज्ज्ञ व प्रगत शिक्षण संस्था, फलटणच्या विश्वस्त डॉ. मंजिरी निंबकर, प्रकल्प अधिकारी राहुल मुळीक, मुख्याध्यापिका प्रियदर्शनी सावंत, प्रकल्प अधिकारी सोमीनाथ घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.