दैनिक स्थैर्य | दि. १८ मार्च २०२३ | फलटण |
राजाळे (ता. फलटण) गावात नवीन बसस्थानक उभारण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील राजाळे हे फलटण-आसू रस्त्यावरील मोठे गाव असून या गावातून अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी फलटण, बारामती यासारख्या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी जात असतात. या ठिकाणचा आठवडी बाजार गुरुवारी भरतो. राजाळे गावच्या पंचक्रोशीतून लोक बाजारासाठी येतात. सरडे, सोनगाव, टाकळवाडा, साठे इ. गावातील लोकांची वर्दळ नेहमीच राजाळ्याच्या स्टॅण्डवर असते. या ठिकाणी असणारे बसस्थानक पन्नास वर्षांपूर्वीचे असून आजतागायत त्याची दुरूस्ती झालेली नाही. त्यामुळे या बसस्थानकाच्या आजूबाजूला बरीचशी अतिक्रमणे झालेली आहेत. त्या ठिकाणी दारू पिणारे लोक बसस्थानकाचा उपयोग विश्रांती घेण्यासाठी करतात. त्यामुळे महिला व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची गैरसोय होत असते. वारंवार मागणी करूनही या बसस्थानकाची दुरूस्ती होत नाही.
संबंधित विभागाने याची दखल घेऊन राजाळे गावामध्ये नवीन बसस्थानक उभारावे, अशी प्रवाशांकडून मागणी होत आहे.