होम मैदानावर बहुमाध्यम प्रदर्शनाचा समारोप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ जानेवारी २०२३ । सोलापूर भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूरच्या वतीने श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित होम मैदान येथे दिनांक १९ ते २३ जानेवारी दरम्यान बहुमाध्यम छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप झाला असून पाच दिवसांत लाखो नागरिक व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट दिली असल्याची माहिती क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली.

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या निमिताने महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाना आणि आंध्रप्रदेश या राज्यातून येणारे भविक व विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या माहिती, आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ आणि केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती पोहोचावी या उद्देशाने प्रथमच होम मैदान येथे भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूरच्या वतीने बहुमाध्यम प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रदर्शनात १८५७ ते १९४७ पर्यतच्या स्वातंत्र्यसंग्रामाची माहिती, सोलापुरातील चार हुतात्मे, आयुष्यमान भारत, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष, आयुष्यमान भारत आणि केंद्र शासनाच्या ८ वर्ष सेवा सुशासन, गरीब कल्याण उपक्रमांतर्गत राबविल्या जात असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची छायाचित्रे व मजूकर सहित माहिती या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. वी आर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लहान बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी साबरमती आश्रम आणि ऐतिहासिक स्थळे पाहण्याचा अनुभव घेतला. या प्रदर्शनाला सोलापूर शहरातील दोनशे शाळेतील तीन हजाराहून अधिक शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी आजादी क्यूस्ट आणि हिरोज ऑफ भारत या ऑनलाइन गेमिंग एपचा आनंद घेतला. क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली आणि विजेत्यांना आकर्षक पारितोषिक देण्यात आली.

होम मैदान येथे पार पडलेल्या पाच दिवसीय बहुमाध्यम छायाचित्र प्रदर्शनात भारत सरकारच्या प्रकाशन विभागाची इतिहास,कला, साहित्य, संस्कृती,अर्थ,विज्ञान, क्रीडा,गांधीसाहित्य, बालसाहित्य, अशा विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके तसेच राष्ट्रीय नेत्यांची भाषणे, मान्यवरांची चरित्रे या विषयावरील पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली असून सोलापूरकरांचाही या पहिल्याच पुस्तक विक्री केंद्राला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्याचे प्रकाशन विभागाचे उपसंचालक उमेश उजगरे यांनी सांगितले. तसेच या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

सकाळी १० ते रात्री ०९ वाजे पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य खुले ठेवण्यात आले होते. दररोज भैरव मार्तंड व जयभवानी कलापथकाचे मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवसांत सोलापूर शहर व जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील नागरिक, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद दिला. लाखाहून अधिक जणांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे.

यावेळी केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव, कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, ग्लोबल मिडिया एजन्सीच्या विज्ञा रॉय, भूषण डोळस, जतीन देसाई, प्रकाशन विभागाचे वितरण सहायक अविनाश बंगेरा, एम टी एस सदाशिव बारमळे आणि संतोष जाधव यांनी प्रदर्शनाचे नियोजनासाठी परिश्रम घेतले होते.


Back to top button
Don`t copy text!