एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलाने लावला अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू

मुलाला जमावाने केली बेदम मारहाण


दैनिक स्थैर्य । 22 जुलै 2025 । सातारा। सातारा शहरातील बसाप्पा पेठ येथे सोमवारी दुपारी4 वाजता थरारक घटना घडली. अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीच्या गळ्याला धारदार चाकू लावत खळबळ उडवून दिली. एकतर्फी प्रेमातून अघटीत घटना घडता घडता वाचली. सातारा शहर पोलीस व जमावाने प्रसंगावधान राखत मुलीची माथेफिरु मुलाच्या तावडीतून व चाकूतून सुटका करत संशयित मुलाला बेदम चोप दिला.

याबाबत अधिक माहिती अशी, संशयित मुलगा गेल्या काही महिन्यांपूर्वी बसाप्पा पेठेत राहत होता. त्यावेळीपासून तिला अल्पवयीन मुलगी आवडत होती. ही बाब मुलीच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी मुलाला समज दिली होती. त्यानंतर सुरुवातीला मुलाने मुलीला त्रास दिला नाही. मात्र सोमवारी अचानक याप्रकरणाचा हायहोल्टेज ड्रामा सातारकरांनी पाहिला. संशयित मुलगा दुपारपासून मुलगी राहत असलेल्या बिल्डींगखाली घुटमळत होता. मुलगी शाळेतून येण्याची तो वाट पाहत होता. मुलगी शाळेतून बिल्डींग खाली येताच मुलगा मुलीच्या जवळ गेला. या घटनेने मुलगी घाबरली.मुलगी आरडाओरडा करत असतानाच मुलाने धारदार चाकू काढून तो उजव्या हातात घेतला, तर दुसर्‍या हाताने मुलीचा गळा त्याने आवळला. यामुळे मुलीला सुटका करण्यास अडथळा आला. चाकू पाहून मुलगी गर्भगळीत झाली. अचानक आरडाओरडा झाल्याने बिल्डींगमधील नागरिक, परिसरात नागरिक गोळा झाले. पाहता पाहता जमाव जमू लागला. यावेळी संशयित मुलगा कोणालाही जवळ येवू देत नव्हता. मुलीला चाकूच्या टोकावर मुलाने धरल्याचे पाहून मुलीचे कुटुंबिय हादरुन गेले. परिसरातील महिलाही घाबरुन गेल्या.

जमाव वाढत असल्याचे पाहून मुलगा सर्वांना तेथून जाण्यास बजावत होता. सर्व जमाव व ती मुलगी मुलाला शांत होण्यास सांगत होती. मात्र मुलगा कोणाचेही ऐकत नव्हता. यादरम्यान या घटनेची माहिती सातारा शहर पोलिसांना समजली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुमारे 15 मिनिटानंतर जमावातील एकाने व पोलिसांनी मुलाचा ताबा मिळवत मुलीची सुटका केली. यानंतर संतप्त बनलेल्या जमावाने मुलाची यथेच्छ धुलाई केली. या घटनेनंतर पोलीस व्हॅनमधून संशयित मुलाला तेथून उपचारार्थ रुग्णालयात हलवण्यात आले. रात्री उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. अधिक तपास शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!