स्थैर्य, नवी दिल्ली, दि. २५ : नौदल आणि सागरी विज्ञानामध्ये संस्थात्मक संबंध प्रस्थापित करणे आणि तज्ज्ञांचे सहकार्य घेणे, यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या एकात्मिक मुख्यालयाच्यावतीने भारतीय नौदलाच्या नौदल महासागर विज्ञान आणि हवामानशास्त्र विभाग आणि सीएसआयआर म्हणजेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधनाच्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था यांच्यातर्फे सामंजस्य करार करण्यात येणार आहे.
या सामंजस्य करारावर उद्या, 24 डिसेंबर, 2020 दुपारी 12.00 वाजता आभासी माध्यमातून स्वाक्षरी करण्यात येणार आहेत. नौदलाचे सागरी विज्ञान आणि हवामानशास्त्र विभागाचे कमोडोर ए ए अभ्यंकर आणि एनआयओचे संचालक प्राध्यापक सुनील कुमार सिंग तसेच कमोडोर एसएमयू अथार, कॅप्टन एम के महावार आणि कमांडर पवनजीत सिंग, व्यवसाय विकासक डॉ. व्ही. सनील कुमार, वेंकट कृष्णमूर्ती यांच्या उपस्थितीमध्ये हा सामंजस्य करार होणार आहे.
भारतीय नौदल आणि सीएसआयआरची राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अनौपचारिक सहकार्य केले जात आहे. आता या उभय संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात येणार असून त्यामुळे परस्परांना सागरी क्षेत्रातले सहकार्याने अधिक चांगले कार्य करणे शक्य होणार आहे. यामध्ये सागरी माहितीचे संकलन, पर्यावरणीय प्रभावाचे मूल्यांकन यामध्ये उभय बाजूंकडे असलेल्या कौशल्यांचे सामायिकीकरण होवू शकणार आहे.