दैनिक स्थैर्य | दि. ३० मे २०२३ | फलटण | मागील वर्षी व त्यापूर्वीही बर्याच ऊस वाहतूकदारांची तसेच ऊस तोडणी कंत्राटदारांची आर्थिकदृष्ट्या फसवणूक झाली आहे. आगामी उसाच्या हंगामातही अशी फसवणूक होण्याची शक्यता असल्याने अशा फसवणूक झालेल्या ऊस वाहतूकदार व कंत्राटदारांनी फसवणूक झाल्याबाबतचा माहिती अर्ज घेऊन उद्या, दि. ३० मे रोजी दुपारी ३ वाजता कोळकी येथील रेस्ट हाऊसमध्ये हजर राहावे, असे आवाहन फलटण पोलीस उपविभागातर्फे करण्यात आले आहे.
या बैठकीत फसवणूक झालेल्या सर्व ऊस वाहतूकदार व कंत्राटदारांची रक्कम कशी परत मिळेल, त्यांनी कोणत्या कायदेशीर मार्गाने जावे, भविष्यात फसवणूक होऊ नये म्हणून काय करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या बैठकीस जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, पोलीस उपअधीक्षक राहुल धस तसेच फलटण शहरचे निरीक्षक शंकर पाटील, ग्रामीणचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे व लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी उपस्थित सर्वांना योग्य ते मार्गदर्शन केले जाणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन फलटण पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.