
दैनिक स्थैर्य | दि. 21 जुलै 2025 । फलटण । येथे उद्या मंगळवार दि. 22 जुलै रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाअभियानाचा भाग आहे. फलटण येथील महाराजा मंगल कार्यलय येथे या उपक्रमास भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेनेसह महायुतीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
रक्तदान हा सर्वोत्तम दान असून, रक्ताची सदैव गरज असते. अनेकदा आपत्कालीन वेळी रक्ताची उपलब्धता नसल्याने जीवहानीचा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर लोकांना रक्तदानासाठी उद्युक्त करणे तसेच रक्तपेढ्यांतील रक्तसाठा वाढविणे हे या शिबिराचे मुख्य ध्येय आहे. या संदर्भात आमदार सचिन पाटील आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
फलटण तालुक्यातील नागरिक, भाजप व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक सर्वांनी या रक्तदान शिबिरात उपस्थित राहून सहभाग घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले. यामुळे रक्तदान संस्कृतीत वाढ होण्यास मदत होईल व गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होण्यास हातभार लागू शकेल.