
दैनिक स्थैर्य । दि. १९ ऑक्टोबर २०२२ । सातारा । अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने आत्माराम लक्ष्मण पाचपुते, रा. पाचपुतेवाडी, ता. पाटण याला कलम ३५४ नुसार दोषी धरून १ वर्ष सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास, पोक्सो कलम ८ नुसार ३ वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड, दंड न दिल्यास १ महिना साधा कारावास आणि पोक्सो कलम १० नुसार ५ वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारवास अशी शिक्षा ठोठावली.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. १५ सप्टेंबर २०२१ रोजी ६ वागण्याच्या सुमारास पाचपुतेवाडी गावच्या हद्दीत आत्माराम लक्ष्मण पाचपुते याच्या राहत्या घरी एक अल्पवयीन मुलगी दळण आणण्याकरता गेली होती. त्याने तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन दरवाजा आतून बंद करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. आर. पवार यांनी करून आत्माराम पाचपुते यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात न्या. श्रीमती होरे यांनी पाच साक्षीदार तपासल्यानंतर आत्माराम पाचपुते याला वरील प्रमाणे शिक्षा ठोठावली. सरकारी वकील म्हणून आर.सी. शहा यांनी कामकाज पाहिले. त्यांना पाटणचे उपयोगी पोलीस अधिकारी विवेक लावंड यांनी मदत केली.