सातारा पोलिसांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारा एका रात्रीत पोलिसांच्या जाळ्यात


स्थैर्य, सातारा, दि. 22 : पोलीस कर्मचाऱ्यांना तुमची बदली करून देतो अशी बतावणी करून एका इसमाने, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना फोन करून पैशाची मागणी करून पैसे स्वीकारून फसवणूक केली असल्याबाबत तसेच नुकतेच साताऱ्यातील पोलिसांनाही फोन करून फसवण्याचा प्रयत्न  केला असल्याबाबतची माहिती सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना त्यांच्या गोपनीय सूत्रांकडून मिळाली.

माहितीचे स्वरूप गंभीर असल्याने सातारा पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांच्याकडून या गोष्टीची शहानिशा स्वतः करून घेतली.

सातारा जिल्ह्याच्या वाई उपविभागाचे अंतर्गत असणाऱ्या वाई आणि पाचगणी पोलीस स्टेशन येथे एकूण तीन कर्मचाऱ्यांना अशा इसमाने फोन केल्या बाबतची माहिती काल रात्री उशिरा प्राप्त झाली.

साताऱ्यातील  तिन्ही कर्मचाऱ्यांनी  सदर इसमाला ओळखून त्यात पैसे पाठवण्यास नकार देऊन त्याची योजना निष्फळ केली होती मात्र असा गुन्हेगार मोकाट राहता कामा नये यासाठी त्याने केलेल्या फसवणुकीच्या प्रयत्नासाठी तसेच स्वतःचे नाव, पद याबाबत दिलेल्या खोट्या ओळखीसाठी  त्यावर तात्काळ दोन्ही पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले.  तात्काळ तपास प्रारंभ झाला, व बारा तासांच्या आत अज्ञात आरोपीचा शोध घेऊन आज त्यास पुणे शहरातून ताब्यात घेण्यात आलेले आहे व पुढील चौकशी सुरू आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वात पुण्यातून ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक साबळे व इतर कर्मचार्यानी रात्रभर सदर आरोपीचा शोध घेऊन सदर इसमास शीघ्रतेने  ओळखले आहे. सदर इसम हा इतरही गुन्हातील आरोपी आहे. सदर इसमाचा इतर साथीदारां बाबत विचारपूस सुरू आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील नागरिक तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आवाहन केले आहे की “फोनवर खोटी माहिती देऊन फसवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात आपल्या अवतीभवती घडत असतात, यापासून बचाव करण्यासाठी  सर्वांनीच सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे, मोबाईल फोन,  ई-मेल, सोशल मीडिया यांचा वापर करून प्रलोभने दाखवणार्‍या व्यक्तींपासून  सावध राहणे आवश्यक आहे. या प्रकारातील संशयास्पद फोन कॉल आपणापैकी कुणासही  आला तर तात्काळ पोलिसांशी संपर्क करा. 

हीच बाब पोलीस अधिकारी किंवा कर्मचार्‍यांच्या बाबतीत घडल्यास त्यांनी तात्काळ आपल्या वरिष्ठांना याची कल्पना द्या. आपल्या सतर्कतेतून  अशा फसवणुकीच्या  घटना टाळणे  सहज शक्य आहे.”


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!