‘राजे’गटाला जबरदस्त सुरुंग; ५०० हून अधिक युवकांनी स्वीकारला ‘विकासपुरुष’ रणजितसिंहांचा मार्ग!


स्थैर्य, विडणी, दि. ४ फेब्रुवारी : राजकारणात लाटा येतात आणि जातात, पण जेव्हा जमिनीवरचा कार्यकर्ता नेत्याची साथ सोडतो, तेव्हा समजायचे की त्या नेत्याच्या सत्तेचा अस्त जवळ आला आहे. फलटणच्या राजकारणात सध्या हेच चित्र स्पष्ट दिसत आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहू लागताच ‘राजे गटा’च्या गडाचे बुरुज ढासळू लागले आहेत.

माजी खासदार आणि भाजपचे नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत आज ५ गावांमधील युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे, आजवर ‘राजे गटा’साठी रात्रंदिवस राबणाऱ्या तब्बल ५०० हून अधिक युवकांनी आज उघडपणे राजेंच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत रणजितसिंहांचे नेतृत्व स्वीकारले.

निष्ठावंतांचा भंगला मोह, विकासाकडे ओढा

रामराजे नाईक निंबाळकर यांनी सत्तेसाठी कधी राष्ट्रवादी (शरद पवार गट), कधी अजित पवार गट, तर कधी पुन्हा शरद पवार गट अशी जी कोलांटीउडी मारली, त्यामुळे सामान्य कार्यकर्ता संभ्रमात आणि अस्वस्थ होता. दुसरीकडे, लोकसभेतील पराभवानंतरही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जनतेशी नाळ तोडली नाही. उलट, नीरा-देवधरचे पाणी असो किंवा केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आणलेला कोट्यवधींचा निधी; रणजितसिंह हेच ‘पाणीदार नेतृत्व’ असल्याचे सिद्ध झाले आहे.

या भव्य प्रवेश सोहळ्याला माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, ज्येष्ठ नेते मिलिंद नेवसे आणि विडणीचे धडाडीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची प्रमुख उपस्थिती होती. सागर अभंग यांच्यासारखा तगडा जनसंपर्क असलेला नेता रणजितसिंहांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिल्याने विडणीत भाजपची ताकद कित्येक पटीने वाढली आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तोंडावर लागलेली ही ‘इनकमिंग’ची रीघ पाहता, राजे गटाला आता कार्यक्रते शोधण्यासाठी दुर्बीण घ्यावी लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विधानसभेत सचिन पाटलांनी आणि नगरपालिकेत समशेरसिंहांनी जो विजयश्री खेचून आणला, तीच पुनरावृत्ती जिल्हा परिषदेत होणार, याची ही नांदी आहे.

फलटणच्या राजकारणात आता दहशतीची आणि हुकूमशाहीची भाषा चालणार नाही, तर फक्त विकासाची भाषा चालेल, हे विडणीतील युवकांनी आज दाखवून दिले आहे. रणजितसिंहांच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्राला एक ‘व्हिजनरी’ नेता मिळाला आहे, आणि जनता आता त्यांच्याच पाठीशी ठाम उभी आहे.


Back to top button
Don`t copy text!