स्थैर्य, पिंपरी, दि. २७: पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे करोना नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही कारवाई आणखी कडक केली जाणार आहे. करोनाचे नियम मोडणाऱ्या नागरिकांना आता महिला धडा शिकवणार आहेत. त्यासाठी महिला संघटनेच्या सदस्यांना पाचारण करण्यात येणार आहे. तसेच माजी सैनिकांचाही समावेश केला जाणार आहे. यांच्या माध्यमातून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. 26) पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे व वाहतूक पोलीस विभागाचे सहायक आयुक्त डिसले आदी उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त अजित पवार म्हणाले, शहरातील मोठ्या 85 चौकांची निवड करण्यात आली आहे. याठिकाणी सर्वाधिक गर्दी असते. तसेच याठिकाणी नागरिक नियम मोडत असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे या चौकामध्ये विशेष कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी 50 माजी सैनिकांना घेण्यात येणार आहे. त्यांच्या माध्यमातून मास्क न वापरणे, रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तर एका महिला संघटनेच्या सदस्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. या महिलांच्या माध्यमातून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या महिलांना एक महिन्यासाठी मानधनावर घेण्यात येणार आहे. त्यांना 10 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. तसेच ज्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे, त्यांच्या दंडाच्या पावतीमधून 30 टक्के इन्सेन्टिव्ह दिला जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
पालिकेतही कठोर नियम
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापालिकेमध्ये नियम कठोर करण्यात आले आहे. पालिका भवनामध्ये पुष्पगुच्छ व इतर पार्सल आणण्यास सक्त मनाई केली आहे. त्यासोबतच अधिकारी, कर्मचारी यांना कार्यालयामध्येही मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.