इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल – उद्योगमंत्री उदय सामंत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ एप्रिल २०२२ । पुणे । रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीत इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (इएमसी) प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लघु उद्योग सुरू होऊन तरुणांना रोजगार मिळेल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज केले.

रांजणगाव औद्योगिक वसाहत येथील रिया हाऊस येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (इएमसी) व चाकण व तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पुणे क्षेत्राचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे, अधीक्षक अभियंता आर.एस. गावडे, कार्यकारी अभियंता दिलीप जोगवे, मारुती कालकुटकी, संजय कोतवाड, प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर आणि स्थानिक उद्योग समूहातील प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, रांजणगाव औद्योगिक वसाहतीत केंद्र शासनाने इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प मंजूर केला आहे. हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प असून या प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांसाठी राज्य शासनाने ३४७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर ६५० कोटी रुपयांचा निधी पाईप लाईनसाठी मंजूर केला आहे. प्लग आणि प्लेचे ६० युनिट सुरू करण्यात येत आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास ५० एकर जागेत हे क्षेत्र वाढवण्याचा मानस आहे.

उद्योग संघटनेने मागणी केलेल्या कौशल्य केंद्रासाठी व कामगार रुग्णालयासाठी प्रत्येकी ५ एकर जागा तसेच पोलिस विभागाच्या कार्यालयासाठी जागा देण्याचे मंजूर केले आहे. पथदिव्यांसाठी १४ कोटी, अंतर्गत रस्त्यासाठी १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. भविष्यात या ठिकाणी हेलिपॅड, कामगारांच्या निवासाची सोय करण्यात येईल.

उद्योगांना पोषक वातावरण तयार करण्यासाठी शासनाचे सर्वोपोतरी सहकार्य राहील. राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग यावेत यासाठी शासन पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना सोई सुविधा, सवलती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. येथील उद्योगांनी स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. उद्योगांची वाढ होत असताना परिसरातील रस्ते, पायाभूत सुविधा वाढत असतात. त्याप्रमाणेच तेथील तरुणांनाही रोजगार मिळाल्यास अशा उद्योगांच्या मागे तेथील स्थानिक युवक उभे राहतील असे सांगून इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प वेळेत पूर्ण करावा, अशा सूचना श्री. सामंत यांनी दिल्या.

यावेळी मुख्य अभियंता श्री. वानखेडे यांनी प्रकल्पाबद्दल माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!