स्थैर्य, मुंबई, दि.३: मंगळवारी मुंबईतील गोरेगाव भागातील एका स्टुडिओच्या भागाला भीषण आग लागली. येेथेच आगामी ‘आदिपुरुष’ या मेगा बजेट चित्रपटाचा सेट बनवण्यात आला होता. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभाष आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. ज्या सेटवर हा अपघात घडला त्या ठिकाणी कोणताही मोठा स्टार उपस्थित नव्हता. ताजी माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली.
सेटवर उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ”संपूर्ण सेट लाकूड आणि ताडपत्रीने तयार करण्यात आला होता. आगीची घटना घडली तेव्हा आदिपुरुष या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे प्रभास आणि सैफ अली खान घटनास्थळी हजर होते. जवळपास 400 जण यावेळी तेथे उपस्थित होते. सुदैवाने जीवीतहानी झाली नाही.”
प्रत्यक्षदर्शीने पुढे सांगितल्यानुसार, दुपारी सवा चार वाजताच्या सुमारास ही आग लागली आणि ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला जवळजवळ दोन तासांचा कालावधी लागला.
या आगीमुळे आदिपुरुषच्या निर्मात्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. सेटवर लावण्यात आलेला ग्रीन क्रोमा जळून खाक झाला आहे.
आजच सुरु झाले होते शूटिंग
आदिपुरुष या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजच मुंबईत सुरुवात झाली होती. अभिनेता प्रभासने स्वतः सोशल मीडियावर चित्रीकरण सुरु झाल्याचे जाहीर केले होते. प्रभासने चित्रपटाचे एक नवीन पोस्टर शेअर करत ‘आदिपुरुष आरंभ’ असे कॅप्शन दिले होते.
अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी काय सांगितले?
अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार, ही लेव्हल 2 ची आग आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या आग विझविण्यासाठी पोहोचल्या आहेत. लक्ष्मी पार्कमध्ये तयार करण्यात आलेल्या या सेटवर जेव्हा आग लागली तेव्हा 400 हून अधिक लोक तिथे उपस्थित होते. सर्वांना सुखरुप तेथून बाहेर काढण्यात आले आहे. आगीमुळे स्टुडिओचे बरेच नुकसान झाले.
एका 6 मजली व्यावसायिक इमारतीलाही आग लागली होती
यापूर्वी मंगळवारी पहाटे मुंबईच्या अंधेरी परिसरातील एका सहा मजली व्यावसायिक इमारतीला आग लागली होती. अग्निशमन विभागाच्या अधिका-याने ही माहिती दिली. त्यांनी सांगितल्यानुसार, अंधेरी येथील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या लक्ष्मी प्लाझा इमारतीच्या वरच्या मजल्यावर लागलेल्या आगीत कोणीही जखमी झाले नाही.
सकाळी 11.15 वाजता अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती मिळाली . ही एक किरकोळ आग असल्याचे अधिकारी म्हणाले. दुपारी दीडच्या सुमारास ही आग आटोक्यात आणल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.