दैनिक स्थैर्य । दि.०२ मे २०२२ । फलटण । हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराज आणि महाराणी छ. सईबाई महाराज यांच्या जीवन प्रवासावर संपन्न झालेल्या शिवव्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या व्याख्यानास फलटण व पंचक्रोशीतील अबाल वृद्धांनी प्रचंड गर्दी केली होती.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मोती चौक शिवजयंती महोत्सव मंडळाच्या माध्यमातून शिवचरित्र व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे छ. शिवाजी महाराज आणि महाराणी छ. सईबाई महाराज यांच्या जीवन प्रवासावर व्याख्यान येथील छ. शिवाजी महाराज चौकात रविवार दि. १ मे रोजी रात्री ८ वाजता आयोजित करण्यात आले होते.
व्याख्यानानंतर रात्री १२ वाजता छ. शिवाजी महाराज पुतळ्यास फलटण तालुका शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते अभिषेक आणि त्यानंतर पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
छ. शिवाजी महाराज आणि महाराणी छ. सईबाई महाराज यांच्या जीवन प्रवासावर आयोजित व्याख्यानापूर्वी फलटण तालुका शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर मोती चौक शिवजयंती महोत्सव मंडळाच्या माध्यमातून प्रतिवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या या उपक्रमाबद्दल संयोजकांना धन्यवाद देत फलटण व परिसरातून उपस्थित राहणाऱ्या अबालवृद्ध शिवप्रेमींना धन्यवाद दिले.
मोठ्या संख्येने शिवप्रेमी अगदी महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता, अत्यंत शांततेत आणि शिस्तीने आयोजित या व्याख्यान आणि शिवपुतळा अभिषेक कार्यक्रम अत्यंत शांततेत व शिस्तीने संपन्न झाले.