दैनिक स्थैर्य । दि. १३ सप्टेंबर २०२२ । फलटण । सर्वसामान्यांपासून अगदी श्रीमंत वर्गापर्यंत सर्वांना पर्यटनाची आवड ही समानच असते. आयुष्यात कधी ना कधी आपल्या एका आवडत्या ठिकाणी जावं, मनसोक्त रहावं, मनोरंजन करावं आणि आपल्या दैनंदिन जीवनातील ताण-तणावातून मुक्त होऊन, चार दिवस सुंदर जगावं असे प्रत्येकाला वाटतं. आणि हे वाटणं सहाजिकच आहे, कारण या धक्काधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला मानसिक विश्रांतीची गरज आहे. आणि हे पर्यटनच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने होतं. हिच नाळ पकडून केंद्रशासनाने ग्रामीण भागातील तरुणांना जगभर पसरलेल्या ट्रॅव्हल इंडस्ट्री मध्ये उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाचा शासकीय उपक्रम असणारा, बँक ऑफ बडोदा ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र थेऊर फाटा पुणे,(BOB-RSETI) यांच्या माध्यमातून आयोजित दहा दिवसाचे विनामूल्य “ट्रॅव्हल अँड टुरिस्ट गाईड” प्रशिक्षण सुरू केले आहे. नुकतीच या कोर्सची यशस्वीरित्या दुसरी बॅच बाहेर पडली.
या कोर्सचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे, केंद्र सरकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमा अंतर्गत “स्किल इंडिया” चेप्रमाणपत्र. दहा दिवस राहणे, जेवण आणि प्रशिक्षणसह सर्व खर्च विनामूल्य आहे. केंद्र शासन, राज्य शासन आणि आरसेटी यांचा संबंध असल्यामुळे या कोर्सला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.
नुकत्याच बाहेर पडलेल्या दुसऱ्या बॅचच्या प्रशिक्षणार्थीनी या कोर्स विषय खूपच सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि बँक ऑफ बडोदा आरसेटी पुणे संचालिका कुलकर्णी मॅडम, प्रशिक्षक सोहम दादरकर, परीक्षक संगीता कळसकर, कार्यालयीन प्रमूख मंगेश माने, विवेक जाधव आणि सहकारी यांचे या परिपूर्ण प्रशिक्षणाविषयी आभार मानले. यावेळी संचालिका कुलकर्णी मॅडम यांनी ग्रामीण तरुण, तरुणींना आवाहन केले आहे की , तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधा. याठिकाणी वेगवेगळे 60 प्रकारचे कोर्स गेल्या 17 वर्षापासून बँक ऑफ बडोदा आरसेटीच्या माध्यमातून यशस्वीपणे चालू आहेत.