
दैनिक स्थैर्य । 29 एप्रिल 2025। सातारा । संगम माहुली येथे छत्रपती थोरले शाहू महाराज, राणी येसूबाई आणि महाराणी ताराबाई यांची समाधी आहे. याठिकाणी लवकरच महाराणी ताराबाई यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासह एकत्रितपणे थोरले शाहू महाराज, राणी येसूबाई यांच्या स्मारकाचे जतन आणि संवर्धन करणे तसेच येथील सर्व मंदिरांची डागडुजी करणे, घाटाची दुरुस्ती व संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करून संगम माहुली एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात येणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, शशिकांत माळी, कोल्हापूर येथील वास्तू अभियंता इंद्रजित नागेशकर, श्रीपाद कुलकर्णी, वन विभागाच्या भारद्वाज, पुरातत्व विभागाचे अधिकारी बारगजे उपस्थित होते.
बैठकीत वास्तू अभियंता इंद्रजित नागेशकर यांनी संगम माहुली येथील प्रस्तावित स्मारक जतन व संवर्धनासंदर्भातील तयार केलेल्या आराखड्याची चित्रफीत दाखवून करावयाच्या कामांची माहिती दिली. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर संगम माहुली येथे थोरले शाहू महाराज, राणी येसूबाई आणि ताराबाई यांची स्मारके एकत्रित जतन व संवर्धित करणे तसेच इतरही काही समाधीस्थळांचे संवर्धन करणे, संगम माहुली येथील सर्व मंदिरांची डागडुजी व संवर्धन करणे, पर्यटनवाढीच्या दृष्टीने घाट विकसित करणे, नदीकाठी होणार्या दशक्रिया विधीसाठीची जागा विकसित करणे, आदी निर्णय घेण्यात आले. हा परिसर विकसित करताना ऐतिहासिक धर्तीवर बांधकामे करणे आणि नदीतील पुराच्या पाण्यामुळे बांधकामांना कोणतीही हानी पोहचू नये अशा पद्धतीने बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अजिंक्यतारा किल्ल्यावर परिसर विकसनाचे काम सुरू आहे. बैठकीत किल्ले अजिंक्यतारा येथे डागडुजी तसेच सुशोभीकरण करणे, किल्ल्यावरील मंदिरांचे जतन व संवर्धन, कार्यक्रमांसाठी छोटेखानी सभामंडप उभारणे, किल्ल्यावर ठिकठिकाणी राज्यातील विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारणे, दक्षिण दरवाजाकडील रस्त्याचे दगडी बांधकाम करणे, ठिकठिकाणी लाईटची व्यवस्था करणे आदी विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य सदरबझार येथील आमणे बंगल्यामध्ये होते तेथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी सर्व सातारकरांची इच्छा आहे. सदरबाजार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास्थान असलेली वास्तू राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली असून हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने येणार्या अडचणींचा आढावा बैठकीत घेण्यात आला. संबंधित जागा मालकाला जागेचा योग्य मोबदला देणे आणि इतर अडचणी दूर करणे याबाबतचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करा. यासंदर्भात राज्य सरकार स्तरावर बैठक लावून तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.