दैनिक स्थैर्य | दि. 20 एप्रिल 2023 | फलटण | फलटणचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता फलटण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा हातात भवानी तलवार घेतलेला भव्य अश्वारुढ पुतळा उभारण्यात यावा तसेच भव्यदिव्य शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या फलटण तालुक्यातील एकमेव शिवकालीन ‘किल्ले संतोषगड’चा जीर्णोद्धार करुन तिथे निसर्गरम्य असे वनपर्यटन केंद्र उभारावे, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.
फलटणमध्ये दरवर्षी परंपरेनुसार अक्षय तृतीयेला शिवजयंती उत्सव भव्य प्रमाणात साजरा होतो. यावर्षीही मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी होणार आहे. सर्व राजकीय पक्ष, कार्यकर्ते, सार्वजनिक मंडळे विशेषत: तरुण वर्ग या उत्सवात मोठ्या प्रमाणावर सहभागी होवून हा उत्सव भव्यदिव्य आणि आदर्शवत करण्याची येथील परंपरा स्वागतार्ह आहे; असे नमूद करुन सर्व शिवप्रेमी नागरिक, नेते, कार्यकर्त्यांनी या पार्श्वभूमीवर फलटण शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा व ताथवडा (ता.फलटण) येथील शिवकालीन ‘किल्ले संतोषगड’ चा जीर्णोद्धार याकडेही लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही बेडकिहाळ यांनी व्यक्त केली आहे. सर्व शिवप्रेमींनी फलटणची अस्मिता ठरणार्या या मागणीचा पाठपुरावा करावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
सदर मागणीच्या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिपक चव्हाण यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.