सातार्‍याच्या नावलौकिकाला साजेसे संमेलन होईल

श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले ; संमेलनस्थळाची पाहणी, योग्य त्या उपाययोजना करण्याच्या प्रशासनाला सूचना


सातारा : मराठी साहित्य संमेलन स्थळाची पाहणी करताना स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्यासह जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आदी.

स्थैर्य, सातारा, दि. 30 डिसेंबर :  सातारा म्हणजे मराठ्यांची राजधानी. या जिल्ह्याला ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि सामाजिक वारसा लाभला आहे. सातार्‍याच्या नावलौकिकाला साजेसे असे शतकपूर्व संमेलन यशस्वी होईल, असा विश्वास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. सातारा येथे येणार्‍या साहित्यरसिकांना कुठल्याही अडचणींना तोंड द्यावे लागू नये यासाठी जिल्हा प्रशासनास त्यांनी मौलिक सूचना केल्या.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे दि. 1 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फौंडेशन आयोजित हे संमेलन शाहू स्टेडियम येथे होत आहे. संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून त्याची पाहणी आज (दि. 29) श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी,निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, सार्वजनिक बांधकाम पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, सहाय्यक आयुक्त अभिजित बापट, पालिका मुख्याधिकारी विनोद जळक, पोलीस उपअधीक्षक राजू नवले, वाहतूक निरीक्षक अभिजित यादव, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक अविनाश कदम, जिल्हा पुरवठा शाखा, विद्युत, आरोग्य विभागाचे अधिकारी, आदी उपस्थित होते.

स्वागताध्यक्ष श्रीमंत्र छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संमेलनाच्या ठिकाणाचा आढावा घेत प्रगतीपथावर असलेल्या कामाचे कौतुक केले. या वेळी बोलताना ते म्हणाले, संमेलनासाठी उपस्थित राहणार्‍या साहित्यिक, साहित्यप्रेमींची उत्तम सोय ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. संमेलनस्थळी मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासह शहराचे सुशोभिकरण करण्याच्या सूचना नगरपालिका प्रशासनास दिल्या आहेत. संमेलनस्थळासह संपूर्ण शहरात युद्ध पातळीवर नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू आहेत. सातारा जिल्ह्याच्या नावाला साजेसे संमेलन करण्याचा प्रयत्न असून राज्यासह, देश-परदेशातील साहित्यिक, साहित्य रसिक, साहित्य प्रेमी आणि वाचकांनी या संमेलनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!