महामार्गावर वाहनांमधील डिझेल चोरणार्‍या टोळीला पकडले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० ऑक्टोबर २०२३ | सातारा |
महामार्गावर रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरणार्‍या टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. त्यांच्याकडून चोरीचे डिझेल आणि मोबाईल तसेच एक वाहन हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी रात्री दहा वाजता करण्यात आली.

करण जगदीश निर्मल (वय २९, गणेश सोसायटी, जुगाव वाशी, मुंबई), राशीद जावेद खान (वय २८, रा. पिंताबर अपार्टमेंट, जुगाव वाशी, मुंबई), धीरज नरेंद्र वर्मा (वय २२, रा. कोपरखैरणे, बोनकोवडे, मुंबई), समीम साहेबमियाँ हुसेन (वय १९, रा. दाखिलभाई बालकृष्ण पाटील नेरूळ गाव राममंदिर जवळ नवी मुंबई) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या सुमारास विश्रांतीसाठी अनेक मालट्रक थांबत असतात. हीच संधी साधून ही टोळी या वाहनांतील डिझेल चोरत होती. असे प्रकार वांरवार घडत असल्याने पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी एलसीबीचे एक स्वतंत्र पथक तयार केले. हे पथक रात्रीच्या सुमारास सातारा ते शिरवळ असे गस्त घालत होते. त्यावेळी सोमवारी रात्री दहाच्या सुमारास पाचगवड, ता. वाई गावच्या हद्दीतील एका हॉटेलसमोर वरील संशयित हे कार थांबवून डिझेल खरेदी करावयाचे आहे का अशी वाहन चालकांना विचारणा करत होते. हा प्रकार तातडीने गस्तीवर असलेल्या एलसीबीच्या पथकाला तसेच भुईंज पोलिसांना समजला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेऊन चारही तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यांच्याजवळ असलेल्या कॅनमधील डिझेल भुईंजजवळील प्रतापगड ढाब्यासमोर उभ्या असलेल्या एका टेम्पोमधून चोरल्याची कबुली त्यांनी दिली. हे चोरीचे डिझेल आणि चोरीसाठी वापरलेली कार, मोबाइल असा सुमारे ४ लाख ५१ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र मोरे, पोलिस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, सचिन साळुंखे, सनी आवटे, अरूण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, ओंकार यादव, पृथ्वीराज जाधव आदींनी कारवाईत भाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!