स्थैर्य, फलटण : लुटमार व दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीस फलटण शहर पोलीसांनी शिताफीने हालचाल करुन अटक केली आहे. या प्रकरणी चार जणांना पोलीसांनी अटक केली असून एक जण फरार झाला आहे. या कारवाईत एक चार चाकी, दोन दुचाक्या व हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
शनिवार दिनांक २५ जुलै रोजी पहाटे अडीच ते पावनेतीनच्या सुमारास गस्तीवर फिरत असलेल्या पोलीसांना पंढरपूर रोडवरील गोविंद दूध डेअरीच्यापुढे एक चार चाकी थांबवून काहीजण तिची नंबरप्लेट बदलत असल्याचे दिसून आले. संशय आल्याने पोलीसांनी गाडी थांबवून त्यांना हटकले असता, ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी लागलीच फलटण शहर पोलीस ठाण्याशी संपर्क करुन तातडीने आधिक कुमक मागविण्यात आली. या नंतर सदर गाडीचा पाठलाग करून ती ताब्यात घेण्यात आली, परंतु त्यांच्यासोबत आणखी दोन मोटारसायकली असल्याचेही दिसून आल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत पोलीसांनी अभिमान अर्जुन खिलारे वय २३ रा. मोरोची ता. माळशिरस जि.सोलापूर, सागर भारत माने वय २२ रा. सुळेवाडी ता. माळशिरस जि. सोलापूर, राजकुमार किसन खिलारे वय २० रा. मोरोची ता. माळशिरस जि. सोलापूर, सुरज संपत भिलारे वय २४ रा. कर्नवाडी ता. भोर जि. पुणे या संशयीत आरोपींना अटक केली तर रमण अडागळे रा. मोरोची ता. माळशिरस, जि. सोलापूर हा पळून जाण्यात यशस्वी ठरला. सदर आरोपी लुटमार व दरोड्याच्या तयारीत होते. अटक केलेल्या आरोपींकडून एक चार चाकी, दोन दुचाक्या, दोन धारधार सुरे, तीन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपी हे लुटमार व दरोड्याच्या तयारीत असताना मिळून आले, तर एक आरोपी पळून गेला आहे. संबांधित आरोपींवर या पुर्वीही गुन्हे दाखल असून त्यांनी आणखी गुन्हे केल्याची शक्यता आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान सदर आरोपींना न्यायालयात उभे करण्यात आले असता, त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस नाईक नितीन भोसले यांनी फिर्याद दिली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन रावळ हे करीत आहेत. सदर कारवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धिरज पाटील, पोलीस उपअधिक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन रावळ, पोलीस नाईक नितीन भोसले, पोलीस हवालदार खाडे, धापते, अच्यूत जगताप, सांडगे यांनी केली.