व्यावसायिकास १० लाखांची खंडणी मागणारी १५ जणांची टोळी जेरबंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० जून २०२३ | सातारा |
वाई येथील एका हॉटेल व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवून तब्बल १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत दरोडा टाकणार्‍या १५ जणांच्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखा व भुईंज पोलिसांनी जेरबंद केले आहे.

या प्रकरणी अनिकेत ऊर्फ बंटी जाधव (रा. भुईंज, ता. वाई), निखिल शिवाजी मोरे, अभिजीत शिवाजी मोरे (दोघेही रा. गंगापुरी, वाई), आरिफ सिकंदर मुल्ला (वय ४३), सागर तुकाराम मोरे (वय ३४), अभिमन्यू शामराव निंबाळकर (वय २५), सुरज मुन्न शेख (वय २१), संदीप सुरेश पवार (वय २३), क्षितीज ऊर्फ सोन्या वीरसेन जाधव (वय १९), गिरिष दिलीप गवळी (वय २५), प्रज्वल बाळकृष्ण पवार (वय २३), प्रतीक बाळकृष्ण पवार (वय २८, सर्व रा. भुईंज, ता. वाई), अमोल महामुलकर (रा. महामुलकरवाडी, ता. वाई), रत्नाकर मधुकर क्षीरसागर (वय २८), निलेश उमेश मोरे (वय २५, दोघेही रा.भुईंज) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

या कारवाईची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १ जून रोजी दुपारी मेनवली, ता. वाई येथील एका हॉटेल व्यावसायिकावर पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी पिस्तुल रोखून त्याच्याकडे १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तसेच व्यावसायिकास ठार मारण्याची धमकी देत त्याच्या गळयातील दीड तोळ्याची सोन्याची चेन जबरीने चोरली.

या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे यांना दिल्या. त्याप्रमाणे त्यांनी भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संतोष पवार, सपोनि रवींद्र भोरे, पोउनि विश्वास शिंगाडे, पोउनि अमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळी तपास पथके तयार केली.

पोलिसांच्या या तपास पथकांनी सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी करून तसेच तांत्रिक मुद्यांवर गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळविली. त्यानंतर संशयित आरोपींचा भुईंज, वाई, पुणे या ठिकाणांहून शोध घेऊन १५ आरोपींना अटक केली. याचा अधिक तपास वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!