सालपे घाटात मालासह ट्रक पळवून नेणारी 11 जणांची टोळी जेरबंद


स्थैर्य, फलटण, दि. १५: सालपे, ता. फलटण येथील सालपे घाटात चालकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आतील मालासह ट्रक पळवून नेणारी 11 जणांची टोळी पोलिसांनी जेरबंद केली. स्थानिक गुन्हे शाखा, सातारा पोलिस आणि लोणंद पोलिसांनी संयुक्तरित्या ही कामगिरी यशस्वी करत चोवीस तासात गुन्ह्याचा छडा लावला व सर्व 11 आरोपींना अहमदनगर, सांगली जिल्हयातील वेगवेगळया ठिकाणाहून अटक करुन चोरीस गेलेला संपूर्ण 14.59 लाखांचा मुद्देमालदेखील हस्तगत केला.

याबाबत माहिती अशी, दि. 13 रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास सालपे, ता. फलटणच्या हद्दीत सालपे घाटातील वळणावर अज्ञात 7 ते 8 जणांनी मालट्रकला ट्रक आडवा मारुन थांबवला. चालक व सोबतच्या इसमाचे हात दोरीने बांधून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम व मालट्रकमध्ये असलेले लोखंडी कास्टिंग व मालट्रक असा 14 लाख 59 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जबरीदस्तीने पळवून नेला. जाताना संशयितांनी चालक व सोबतच्या इसमाला आरोपींच्या ताब्यातील विना नंबरच्या मालट्रकमध्ये टाकुन नांदल, ता. फलटण गांवच्या हद्दीत सोडून निघून गेले.

या घटनेची फिर्याद भाऊसाहेब जिजाबा शिंदे वय 32, रा. बाबुळसर खुर्द, जि. पुणे यांनी दिल्यानंतर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हयाचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी व एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली व 5 वेगवेगळी तपास पथके तयार करुन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. या पथकांनी घटनास्थळापासून जाणारे सर्व मार्गावरील सी.सी.टी.व्ही फुटेज तपासले तसेच फिर्यादी व त्याचे सोबत सांगली येथून आलेला इसम यांची चौकशी केली. त्यांच्या हकीगतीमध्ये विसंगती दिसून आली. त्यामध्ये फिर्यादीसोबत आलेला इसम काहीतरी खोटे बोलत असल्याचे जाणवले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने सांगली जिल्ह्यातील गावाकडील व परिसरातील साथीदारांसह कट करुन गुन्हा केल्याचे कबूल केले. तसेच मुख्य आरोपी चोरीस गेलेला मुद्देमाल नागपूर एम.आय.डी.सी. अहमदनगर येथे विक्रीकरीता घेवून जाणार होता, असे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन अहमदनगर येथे कळवन त्यांची मदत घेतली. त्यांनी एम. आय. डी. सी. मधील संबंधीत कंपनीत जावून खात्री केली असता 4 आरोपी चोरीस गेलेल्या मद्देमालापैकी काही 1 टन माल संबंधीत कंपनीत विक्री करुन गेल्याचे समजले. ताब्यात असलेल्या संशयीताकडे अधिक चौकशी केली असता त्याने बाकीचे आरोपी सांगली जिल्ह्यात गावी गेल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच तपास पथकांमधील मनुष्यबळाचे योग्य नियोजन करुन अहमदनगर येथून 4, तसेच सांगली जिल्हयातील कवलापूर, कुपवाड, मिरज व कवठेमहंकाळ अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून 6 आरोपींना ताब्यात घेण्यास तसेच गुन्हयातील चोरीस गेलेला 6 लाख किमतीचा मालट्रक, 8 लाख 50 हजार रुपये किमतीचे 7 टन वजनाचे करारो इंडीया या कंपनीचे लोखंडी कास्टींगचे जॉब तसेच 7 हजार 800 रुपये किमतीचे 2 मोबाईल हॅण्डसेट असा एकूण 14 लाख 59 हजार 300 रुपये किमतीचा संपुर्ण मुददेमाल हस्तगत करण्यात तपास पथकांना यश आले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि रमेश गर्जे, लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर, फलटण शहरचे सपोनि सचिन राऊल तसेच पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख, पो.ना. शरद बेबले, नितीन गोगावले, गणेश कापरे, प्रविण फडतरे, निलेश काटकर, विक्रम पिसाळ, रोहित निकम, पो.हवालदार महेश सपकाळ, अविनाश नलवडे, पो.ना. संतोष नाळे, ज्ञानेश्‍वर साबळे, पो.कॉ. अभिजीत घनवट, विठ्ठल काळे, श्रीनाथ कदम, अमोल पवार, सागर धेंडे, केतन लाळगे, पो.ना. नितीन चतुने, सर्जेराव सुळ, सुजित मंगावडे, दिग्विजय सांडगे, फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे पो.ना. देवा तुपे, महेश जगदाळे, सचिन पाटोळे यांनी केली.

अटक आरोपींची नावे
सतिश विष्णु माळी वय 25 वर्षे रा. एमआयडीसी कुपवाड, मुळ रा. कवलापुर ता. मिरज जि.सांगली, सुनिल ढाकाप्पा कदम वय 22 रा. कवलापुर रोड एमआयडीसी कुपवाड जि.सांगली, सौरभ सुधाकर झेंडे वय 20, आकाश शैलेद्र खाडे वय 23, गुरुप्रसाद सुदाम नाईक वय 21, सुशांत रमेश कांबळे वय 30, ज्ञानेश्‍वर दत्तात्रय पवळ वय 19, प्रतिक कुमार नलवडे वय 19, किरण राजाराम माळी वय 23 सर्व रा. कवलापुर ता. मिरज जि.सांगली, संग्राम राजेश माने वय 23 रा. बोरगांव, ता. कवठेमहांकाळ जि. सांगली, विजय संभाजी चौगुले वय 21 रा. संजयनगर ता. जि. सांगली


Back to top button
Don`t copy text!