
अर्ध्यावरती खेळ मोडीला अधूरी एक कहाणीवाली स्थिती सध्या आपण सारे अनुभवत आहोत.यात कोणाचे दुमत नसावें.आयुष्यात येऊन काही न काही खेळ खेळणे म्हणजेच जीवन जगणे. कुठल्याही जगण्याचे हेच सार आहे. तुम्ही खेळा अगर खेळू नका काळ खेळल्या शिवाय रहायचा नाही. अर्थात तुम्ही खेळत आहात हा तुमचा समज असतो. पण खरं म्हणाल तर तो प्रचंड मोठा असा गैरसमज असतो. आयुष्याचा खेळ झाल्या शिवाय तो कळत नाही हेच खरं. खेळ का खेळखंडोबा हा तर ज्याच्या त्याच्या समजाचा प्रश्न असतो.
नियती घडवेल तेच घडत असते तुम्ही फक्त त्याला ‘मी’चे लेबल चिकटवत असता. चारा खा पाणी पी आणि भुर्रकन उडून जा हे बालपणी शिकवण्याचे कारण हेच असावे. भुर्रकन उडून जाणे हा आपल्या साऱ्या खेळाचा अविभाज्य भाग असतो.भातुकलीच्या खेळातल्या राजा आणि राणीचे तेच प्रारब्ध असते. नियतीचा खेळ हा कायमच पॉवर प्ले स्वरूपातला असतो. तुम्ही कितीही फ्री हिट साठी तयार असलात तरीहि रन आऊट करणे नियतीला सहज शक्य असते, हे आणि हेच,आताच्या पहलगाम नरसंहाराने सिद्ध केले आहे.
लग्न होऊन केवळ सात आठ दिवस झालेला हा खेळ, किती फिल्मी पद्धतीने खेळली, ही नियती?. ओली हळद कोरडी व्हायच्या आत कामोत्सुक ललनेने आपले सौभाग्य हरपले. अशा नववधूस हा खेळ समजायच्या आताच तिने आपल्या सौभाग्याची विकेट गमावली असेच झाले म्हणायचे. भुर्रकन उडून गेलेले तिचे सौभाग्य हा कोण्या जिहादीच्या खेळाचा भाग झाला असेच समजायचे का? टेबल पॉईंट वर, वरखाली होण्या पूर्वीच स्पर्धेबाहेर पडल्या सारखेच झाले हे! अशा वेळी मनात एकच विचार थैमान घालत रहातो आणि थर्ड अंपायर ला अपील करून म्हणतो की अरे जरा खांद्या वर उडालेल्या नो बॉलला कुठं तरी लपायची फ्री हिट तरी द्या राव.
नियतीला अशा जिहादींशी ,टाय ब्रेक खेळणे कधी जमणार आहे ,हेच कळत नाही. एखादी सर्व्हिस गेम घेणे एवढे सुद्धा तीच्या हातात नाही कां?कलियुग म्हणून असल्या “एस सर्व्हिस” वाल्या गोष्टी आपण किती दिवस सहन करत राहणार. भगवान के घर न्याय नहीं अन्याय है ची याचिका आपण कितीदा घेऊन जाणार? निष्पाप पर्यटकांना आपल्या जिहादच्या टार्गेट वर नेण्या पूर्वी नियतीला थोडी सुद्धा कीव आली नाही हे समजणे थोडे अवघड आहे.पृथ्वी वरच्या स्वर्गाला भेट देता देता डायरेक्ट स्वर्गवासी होणे कोणाला झेपेल? पण परवा पासून जे दिसतंय त्यात निसर्ग ,नियती, दैव, देव इत्यादी सारे पक्षपाती आहेत एवढेच सिद्ध होत आहे.
सगळ्या पुण्य पापाचा सारा हिशोब ह्या जन्मा च्याच खेळात संपवावा लागतो. पण मग पर्यटनासाठी गेलेल्यांचे पुण्य कमी पडले का नराधमांचे पाप डोईजड झाले हे कळायला मार्ग नाही.शेवटी जीवांच्या खेळाचा हा सामना पापाच्या घड्याने आपल्या शिरी धारण केला हे सत्य म्हणावे लागेल.मग तो त्रिभुवन त्राता जगन्नाथ काय झोपला होता का? का नेहमी प्रमाणे शंभर अपराधांची वाट बघत राहिला अशी स्थिती उभी राहते. जात धर्म विचारून जीव घेताना त्या नराधमाची बंदूक एकदम त्याच्या कडेच का वळली नाही,त्याची सुटलेली गोळी त्यालाच का लागली नाही हा पडलेला प्रश्न आहे .
अशा वेळी सगळे चमत्कार कुठे गायब होतात कुणास ठाऊक.स्पीरिट्युअली जाऊन द्यात पण देर है अंधेर नहीं कुठं गायब होतो अशा वेळी हा मुख्य प्रश्न आहे. यदा यदा ही वाला किती ग्लानिर्भवतू ची वाट पाहात आहे त्याच्याच जीवास माहित.पहिल्या बॉल ला विकेट, पहिल्या बॉल ला सिक्स, आणि पहिल्या बॉल ला हिट विकेट केवढी तफावत आहे पण हाच जीवनाचा खेळ आहे. कोणी बॉल स्टेडियमच्या बाहेर पाठवेल तर कोणी विनाकारण वाईड बॉल स्टंप वर ओढवून घेईल काही सांगता येत नाही.पण वरमावर बॉल लागून कायम स्वरुपी खेळपट्टी सोडावी लागणे हा कुठला न्याय म्हणायचा. धरती वरच्या स्वर्गातून खऱ्या खुऱ्या स्वर्गात पाठविणारा हा खेळ कुठल्या चित्रगुप्ताने लिहिला देव जाणे, पण अशा वेळी नरका ची दारे, या धर्मांध खलनायकांसाठी कायम बंदच का असतात, हा मात्र थर्ड अंपायरला भेडसावलेला यक्ष प्रश्न कायमच अनुत्तरित राहतो, हीच ह्या खेळाची मजा आहे.
एम.बी.
२४एप्रिल२५