चैतन्याचा सळसळता झरा : रवींद्र बेडकीहाळ !

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


महानगरचे पत्रकार, मित्रवर्य श्री. प्रवीण पुरो हे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या कार्यकारिणी ने माझ्या नांवाची शिफारस महाराष्ट्र शासनाच्या राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य म्हणून केली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कालावधीत ही शिफारस करण्यात आली होती. परंतु 2014 साली भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आणि देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर राज्य अधिस्वीकृती समितीची पुनर्रचना करण्यात आली. या नव्या समितीत माझ्या नांवाचा समावेश करण्यात आला होता.

विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असतांना मला या समितीवर काम करण्याची इच्छा बोलून दाखविली होती. या समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात वावरणाऱ्या छोट्या छोट्या पत्रकारांसाठी काम करावे, ही प्रामाणिक भूमिका होती. असो, पण देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्य अधिस्वीकृती समितीवर काम करण्याचा योग आला. या माध्यमातून आहुति चे संस्थापक संपादक, माझे वडील श्री. वसंतराव त्रिवेदी यांनी साधारण 1970 -1980 या काळात काम केले होते. योगायोगाने मलाही या समितीवर कार्य करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे माझ्या वडिलांबरोबर ज्यांनी ज्यांनी या समितीवर काम केले त्यांच्या बरोबर काम करतांना मला फार मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

या मान्यवरांमध्ये नांदेड चे श्री. कृष्णाभाऊ शेवडीकर आणि फलटणचे श्री. रवींद्र बेडकीहाळ यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. अमरावती येथील दैनिक हिंदुस्थान चे संस्थापक बाळासाहेब मराठे यांच्या बरोबर माझ्या वडिलांनी काम केले, मलाही त्यांचा सहवास लाभला. आता तर त्यांचे नातू आणि सदाबहार विलासराव मराठे, सुधाकरराव डोईफोडे यांचे चिरंजीव प्रजावाणीचे शंतनू डोईफोडे आणि यदुनाथ जोशी यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण समिती सदस्यांसमवेत पत्रकारांना न्याय मिळवून देतांना मनस्वी समाधान लाभले. अर्थात काही गोष्टी राहून गेल्या. पण शेवडीकर आणि बेडकीहाळ यांचे मिळालेले मार्गदर्शन उपयुक्त ठरणारे आहे. रवींद्र बेडकीहाळ म्हणजे मराठी पत्रकारितेतील बाळशास्त्री जांभेकर यांचे खरेखुरे वारसदार म्हणावे लागतील. कारण बाकी कुणी कितीही टिऱ्या बडविल्या, बडविण्याचा प्रयत्न केला तरी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नांव खऱ्या अर्थाने अजरामर करण्याचे काम कुणी केले असेल अथवा करीत असेल तर ते रवींद्र बेडकीहाळ हेच नांव प्रकर्षांने घ्यावे लागेल.

मग पोंभूर्ले या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे कोकणातील मूळ गांवी त्यांचे स्मारक उभे करणे असो की मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे तैलचित्र लावण्याचे महत्कार्य असो, रवींद्र बेडकीहाळ यांनीच यासाठी अग्रेसर राहून या गोष्टी घडवून आणल्या. शासकीय पातळीवर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात यावी यासाठी प्रयत्न करणारेही रवींद्र बेडकीहाळ हेच म्हणावे लागतील. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून रवींद्र बेडकीहाळ यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन अनेक पत्रकारांना सन्मानित केले आहे, करीत आहेत. 22 एप्रिल 1944 रोजी जन्मलेले फलटण या सातारा जिल्ह्यातील रवींद्र बेडकीहाळ यांनी आपले कार्यक्षेत्र केवळ फलटण आणि सातारा जिल्ह्यापुरते सीमित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी आपल्या कामाचा पसारा/व्याप वाढवितांना आपला विशिष्ट ठसा उमटविला आहे. वयाची 75 वर्षे पूर्ण केली असतील, अमृतमहोत्सव पूर्ण केला असेल तरीही विशीतल्या तरुणालाही लाजवील असा चैतन्याचा सळसळता झराच रवींद्र बेडकीहाळ यांच्या रूपाने आपल्याला पहायला मिळतो.

यशवंतराव चव्हाण, शरद पवार, रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पासून पृथ्वीराज चव्हाण यांच्या पर्यंत सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध रवींद्र बेडकीहाळ यांनी ठेवले आहेत. राजवट कोणतीही असो, कुणाचीही असो रवींद्र बेडकीहाळ यांना मंत्रालयात मुक्त संचार करतांना कोणाचाही अडथळा येत नाही. यामुळेच पत्रकारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी रवींद्र बेडकीहाळ हे सदैव तत्पर असतात.

कृष्णाभाऊ शेवडीकर, रोहित वाकडे, प्रकाश कुलथे, विजय मांडके आदींची अख्खी फळीच महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून रवींद्र बेडकीहाळ यांनी उभी केली आहे. रवींद्र बेडकीहाळ हा मराठी पत्रकारितेतील एक ग्रंथाचा विषय आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल कितीही लिहिले तरी ते कमीच पडेल. या अशा चैतन्याच्या सळसळता झरा असलेल्या रवींद्र बेडकीहाळ यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो आणि त्यांच्या हातून सर्वसामान्य पत्रकारांचेही भले होवो, हीच त्यांच्या कुलदैवताकडे विनम्र प्रार्थना !

– योगेश वसंत त्रिवेदी,
9892935321


Back to top button
Don`t copy text!