स्थैर्य, सातारा, दि.१०: सातारा ता (प्रतिनिधी) जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नवीन वर्षातील ‘बोहनी’ वन विभागापासून झाली आहे. त्यामुळे वन विभागाला नक्की झाले तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. लाकडाच्या वखारीवर कारवाई न करण्यासाठी 15 हजार रूपयांची लाच स्वीकारताना चोरे (ता. कराड) येथील वनरक्षकास रंगेहात पकडण्यात आले असून त्याच्याकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
राहुल बजरंग रणदिवे (वय 34) रा.प्लॉट नं.52, कोयना सोसायटी, विलासपूर, गोडोली, सातारा असे या लाचखोर वनरक्षकाचे नाव आहे. संबंधित तक्रारदार यांच्या लाकडाच्या वखारीवर कारवाई न करण्यासाठी वनरक्षक रणदिवे याने 25 हजार रूपयांची लाच मागितली होती.
तथापि, तडजोडीअंती 15 हजार रूपये द्यायचे ठरले. यासंबंधी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर शुक्रवारी (दि.8) सापळा रचण्यात आला. त्यामध्ये राहुल रणदिवे लाच स्वीकारताना रंगेहात अलगद सापडला. त्याच्याकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, पो. ना.ताटे यांनी कारवाई केली.