दैनिक स्थैर्य । दि. २१ जून २०२२ । बिजवडी । टायर व बॅटऱ्या चोरणाऱ्या परराज्यातील टोळीला बिजवडीतील पै.विजय रामहरी भोसले यांनी प्रसंगावाधान राखून युवकांच्या मदतीने पकडून दहिवडी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीसांनी या टोळीकडून ९ लाख ३० हजार रुपयेच्या टायर व बॅटऱ्यासह आदी साहित्य जप्त केले आहे.
याबाबतच मिळालेली माहिती अशी, बिजवडी, ता. माण येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला आपल्या घरासमोर पै. विजय रामहरी भोसले यांनी आपला टाटा कंपनीचा ट्रक (१६१३) लावला होता. दि.१६ जून रोजी रात्री दिड वाजण्याच्या सुमारास बाहेरून काय तरी आवाज आल्याचे लक्षात येताच पै.विजय भोसले यांनी बाहेर येऊन पहिले असता काहीजण आपल्या ट्रकचे टायर काढताना दिसून आले. त्यांनी प्रसांगावधान राखत युवकांना फोन करून माहिती दिली. चोरट्यांना याची चाहूल लागताच त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या आयशर टेम्पोतून पळ काढला. विजय भोसले यांनी नितीन तुकाराम भोसले, नितीन प्रकाश भोसले, करण राक्षे या युवकांच्या साथीने त्या वाहनाचा पाठलाग करून मोगराळे या ठिकाणी चोरांना पकडले. यादरम्यान, त्यांच्यात झटापटही झाली. त्यात बिजवडीतील नितीन प्रकाश भोसले हा युवक जखमी झाला. त्यानंतर दहिवडी पोलीसांना याबाबतची माहिती देऊन चोर त्यांच्या ताब्यात देण्यात आले. दहिवडी पोलीसांनी जितेंद्र रामसिंग धाकड (वय २५ वर्षे ), दिपक कैलास धाकड (वय १९ वर्षे ) दोन्ही रा. मोहना ता. घाटीगांव जि. ग्वाल्हेर राज्य मध्यप्रदेश यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून आयशर टेम्पो , ९ मोठया वाहनाचे टायर (डिस्कसह) व ५ बॅटऱ्या असा ९ लाख ३० हजार ३०० रुपयेचे साहित्य जप्त केले आहे.
दहिवडी पोलीसांनी तपास करत आरोपींकडुन सांगली जिल्हयातील सांगली शहर पोलीस स्टेशन व तासगांव पोलीस स्टेशन येथील टायर व बॅटरी चोरीचे आणखी २ गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदर घटनेचा तपास पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर करत आहेत. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक डी. डी. तुपे, सहायक पोलीस फौजदार पी. जी. हांगे, पो. हे. कॉ. एस. एन. केंगले, आर. पी. खाडे, आर. एस. बनसोडे, ए. एच. नदाफ, टी. एम. हांगे, के. आर. बर्गे यांनी सहकार्य केले.
टायर व बॅटऱ्या चोरणारी परराज्यातील पकडलेली टोळी व त्यांच्याकडून जप्त केलेले साहित्य.