
कोळकी जिल्हा परिषद गटातील वाड्यावस्त्यांवरील अंधार दूर करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांसाठी आ. सचिन पाटील, माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व ॲड. जिजामालाताई यांच्या प्रयत्नातून लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २५ मार्च : कोळकी जिल्हा परिषद गटातील आणि त्याअंतर्गत येणाऱ्या विविध वाड्यावस्त्यांवरील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. आमदार सचिन पाटील, माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून या गटात ‘आमदार फंड’ आणि ‘डोंगरी विकास योजने’तून रस्ते, बंदिस्त गटारे आणि तब्बल ३५ सौर दिव्यांसाठी (Solar Lights) लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती जयकुमार शिंदे यांनी दिली आहे.
३५ सौर दिव्यांमुळे वाड्यावस्त्या होणार प्रकाशमान
ग्रामीण भागातील अनेक वाड्यावस्त्यांवर रात्रीच्या वेळी प्रकाशाची पुरेशी व्यवस्था नसते. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून आमदार फंडातून एकूण ३५ सौर दिवे मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांची, महिलांची आणि शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे.
गावनिहाय मंजूर झालेले सौर दिवे खालीलप्रमाणे:
- ३ दिवे: गिरवी.
- प्रत्येकी २ दिवे: कोळकी, धुमाळवाडी, बोडकेवाडी, भाडळी खुर्द, भाडळी बुद्रुक, सोनवडी बुद्रुक, कुरवली, जाधववाडी, झिरपवाडी, ठाकूरकी, चावडी, दालवडी, निरगुडी, मांडवखडक, विचुरणी आणि सासकल. (एकूण: ३५ दिवे)
रस्ते, गटारे आणि सभामंडपासाठी भरघोस निधी
सौर दिव्यांसोबतच परिसरातील इतर मूलभूत आणि प्रलंबित विकासकामांसाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे:
- आमदार फंडातून मंजूर कामे:
- गोळेगाव – ठाकूरकी रस्ता: १० लाख रुपये
- झिरपवाडी रस्ता: १० लाख रुपये
- गिरवी (जाधववाडा) येथे सभामंडप: ७ लाख रुपये
- डोंगरी विकास योजनेतून मंजूर कामे:
- दालवडी (बंदिस्त गटर योजना): ५ लाख रुपये
- भाडळी खुर्द (बंदिस्त गटर योजना): २.५० लाख रुपये
या सर्व महत्त्वपूर्ण विकासकामांना मंजुरी मिळाल्याने कोळकी जिल्हा परिषद गटातील नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात असून, आ. सचिन पाटील व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आभार मानले जात आहेत. पायाभूत सुविधांच्या या कामांमुळे गावांचा विकास वेगाने होण्यास मदत होणार आहे.

