
स्थैर्य, फलटण, दि. 22 डिसेंबर : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या (खासदार गट) उमेदवार कु. सिद्धाली अनुप शहा यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. या विजयासोबतच सिद्धाली शहा यांनी एक नवीन इतिहास रचला असून, केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात ‘सर्वात तरुण नगरसेवक’ होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला आहे. त्यांच्या या विक्रमी विजयामुळे फलटण शहराचे नाव राज्यभरात झळकले आहे.
प्रभाग क्रमांक ८ मधून सिद्धाली शहा यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव करत ही निवडणूक जिंकली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच सिद्धाली शहा यांनी आघाडी घेतली होती, जी शेवटपर्यंत कायम राहिली. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी एकच जल्लोष केला.
तरुणाईचा विजय आणि ऐतिहासिक विक्रम
कु. सिद्धाली अनुप शहा यांनी अत्यंत कमी वयात नगरपरिषद गाठली आहे. राजकारणात तरुणांचा टक्का वाढावा, अशी चर्चा नेहमीच होते. मात्र, सिद्धाली शहा यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरून आणि विजय मिळवून राज्यातील सर्वात तरुण लोकप्रतिनिधी (नगरसेवक) होण्याचा मान मिळवला आहे. उच्चशिक्षित आणि कायद्याचा अभ्यास असलेल्या (Advocate) सिद्धाली यांच्या रूपाने प्रभागाला एक अभ्यासू आणि तरुण नेतृत्व लाभले आहे.
या विजयाबद्दल बोलताना सिद्धाली शहा म्हणाल्या की, “हा विजय माझा नसून प्रभाग क्रमांक ८ मधील माझ्या तमाम मतदार बंधू-भगिनींचा, तरुणांचा आणि आशीर्वाद देणाऱ्या ज्येष्ठांचा आहे. राज्याची सर्वात तरुण नगरसेविका म्हणून निवडून देताना मतदारांनी जो विश्वास दाखवला आहे, तो मी विकासाच्या माध्यमातून सार्थ ठरवेन.”
वारसा जनसेवेचा
फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांच्या कन्या असलेल्या सिद्धाली यांनी वडिलांच्या समाजकार्याचा वारसा समर्थपणे पुढे नेला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही निवडणूक लढवली. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आणि वडिलांनी दिलेले बाळकडू तसेच स्वतःची जिद्द याच्या जोरावर त्यांनी हा ऐतिहासिक विजय खेचून आणला आहे.
निकालानंतर शहरात सिद्धाली शहा यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणूक काढली. यावेळी ‘सिद्धाली ताई अंगार है..’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
