दैनिक स्थैर्य । दि. १९ डिसेंबर २०२२ । मुंबई । बौद्धजन पंचायत समिती अंतर्गत पर्यटन समितीच्या विद्यमाने समितीचे मा. सभापती सरसेनानी आनंदराज आंबेडकर, उपसभापती विनोदजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी कार्याध्यक्ष किशोरजी मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मणजी भगत, सरचिटणीस राजेशजी घाडगे, खजिनदार नागसेन गमरे यांच्या सहकार्याने, पर्यटन समितीचे अध्यक्ष मुकुंद महाडिक, सरचिटणीस सुरेश मंचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक दास कांबळे, श्रीधर साळवी, अंकुश सकपाळ, राजाभाऊ तथा रामदास गमरे यांच्या सहाय्याने सदर शिष्टमंडळ बौद्ध धम्माच्या धार्मिक व सांस्कृतिक वारसा असलेल्या धम्म स्थळांना भेट देण्यासाठी रवाना झाले आहे.
सदर शिष्टमंडळ १५ दिवसीय दौऱ्यात सारनाथ, कपिलवस्तू, कुशीनगर, श्रावस्ती, लखनौ आंबेडकर परिवर्तन स्थळ (उ.प्र.), बुद्धगया, उरुवेला, निरंजना नदी, सुजाता महाल, सुजाता खीरदान स्थळ, राजगीर (रोपये), विश्वशांती स्तूप, जपानी बुद्ध विहार, नालंदा विश्वविद्यालय, वेणूवन, वैशाली (बिहार), लुंबीनी (नेपाळ), भारतीय पुरातत्व संरक्षण यांच्या अधिपत्याखाली असणारे म्युझियम, बुद्धविहारे, गंधकुटी आदी बौद्ध धम्माचे मानबिंदू असणाऱ्या धम्मस्थळांना भेट देणार आहेत.
जागतिक संस्कृतीचा केंद्रबिंदू तथागत गौतम बुद्ध व त्यांचा बौद्ध धम्म असून प्राचीन काळी संपूर्ण जग बौध्दमय होते परंतु नंतर स्वतःला जगातील सर्वात प्राचीन संस्कृती म्हणवणाऱ्या तथाकथित अर्वाचीन धर्मानी बौद्ध धम्मावर आक्रमण करून बौद्ध संस्कृती, धम्म, धम्मक्षेत्र यांचा ऱ्हास करून तिथे काल्पनिक तीर्थक्षेत्रांना जन्म दिला परंतु त्या आक्रमणात जी धम्मक्षेत्र वाचली अश्या स्थळांना भेटी देऊन समाजात त्यांची पुन्हा नव्याने माहिती, ओळख देऊन त्यांचा प्रचार, प्रसार करून इतरांनी ही त्यातून प्रेरणा घेऊन आपल्या सांस्कृतिक, धार्मिक स्थळांना भेटी देऊन आपला सांस्कृतिक वारसा पुढे जपला नेला पाहिजे या करता सदर शिष्टमंडळ प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन पर्यटन समिती प्रमुख मुकुंद महाडिक यांनी केले आहे.
बौद्धजन पंचायत समिती अंतर्गत पर्यटन समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे होणाऱ्या या दौऱ्यासाठी पर्यटन समिती अध्यक्ष मुकुंद महाडिक, सरचिटणीस सुरेश मंचेकर व सहाय्यक श्रीधर साळवी, दास कांबळे यांनी अथक प्रयत्न केले आहेत अशी माहिती शिष्टमंडळाने आमच्या वृत्तप्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.