
‘शून्यातून विश्व निर्माण करणे’ हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो, पण ते प्रत्यक्षात आणणारे खूप कमी असतात. शिरवली (ता. बारामती) सारख्या ग्रामीण भागातील एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एका तरुणाने केवळ स्वतःच्या जिद्दीवर आणि कष्टाच्या जोरावर जागतिक कृषी क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. त्या जिद्दी तरुणाचे नाव आहे सचिन यादव. ‘के. बी. एक्सपोर्टस’ आणि ‘के. बी. बायो ऑरगॅनिक्स’च्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला जागतिक बाजारपेठ तर मिळवून दिलीच, पण हजारो तरुणांना रोजगाराची संधीही उपलब्ध करून दिली आहे.
संघर्षातून घडले व्यक्तिमत्त्व
सचिन यादव यांचा जन्म २४ डिसेंबर १९७७ रोजी शिरवली येथे झाला. वडिलांचा शेती व्यवसाय असल्याने बालपणापासूनच त्यांची मातीशी नाळ जोडली गेली होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण बारामती येथील महात्मा गांधी बालक मंदिर, तर महाविद्यालयीन शिक्षण एम.ई.एस. विद्यालय आणि पुढे मालोजीराजे शेती विद्यालय, फलटण येथे झाले. कृषी महाविद्यालय, पुणे येथे उच्च शिक्षण घेत असतानाच त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ सुरू झाला होता. तुटपुंज्या उत्पन्नावर शिक्षण पूर्ण करताना त्यांना अनेक कसरती कराव्या लागल्या. बारामतीत शिक्षण घेत असताना पहाटे उठून हॉटेल व्यावसायिकांना घरच्या गाई-म्हशींचे दूध घालण्याचे काम त्यांनी केले. या कष्टानेच त्यांना व्यवसायाचे आणि स्वावलंबनाचे पहिले धडे दिले.
के. बी. एक्सपोर्टस: एक नवे क्षितिज
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डी. वाय. पाटील ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र, कोल्हापूर येथे काम करताना त्यांनी अनुभव समृद्ध केला. मात्र, नोकरीत रमण्यापेक्षा काहीतरी वेगळे करण्याची ध्येयवेडी वृत्ती त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यातूनच २००८ साली फलटण तालुक्यात ‘के. बी. एक्सपोर्टस इंटरनॅशनल’ची पायाभरणी झाली. सुरुवातीला ‘एक्स्पोर्ट’ (निर्यात) हा विषय शेतकऱ्यांसाठी नवीन होता. पण सचिन सरांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ‘रेसिड्यू फ्री’ (विषमुक्त) शेतीचे महत्त्व पटवून दिले.
आज त्यांच्या प्रयत्नांमुळे भेंडी, बेबीकॉर्न, डाळिंब, आंबे, कडीपत्ता आणि दुधी भोपळा यांसारखी उत्पादने युरोपियन बाजारपेठेत २४ तासांच्या आत पोहोचवली जात आहेत. विशेष म्हणजे, विदेशी फळ म्हणून ओळखले जाणारे ‘ड्रॅगन फ्रुट’ देखील ते निर्यात करत आहेत. केवळ एसी केबिनमध्ये बसून निर्णय घेण्यापेक्षा, प्रत्यक्ष प्रोसेसिंग युनिटमध्ये आणि मालाच्या ट्रकमध्ये उतरून पाहणी करण्याच्या त्यांच्या सवयीमुळेच आज गुणवत्तेत त्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे.
विषमुक्त शेतीचा ध्यास आणि ‘के. बी. बायो’चा जन्म
युरोपात माल निर्यात करताना रासायनिक कीटकनाशकांचे अंश (Residue) अडथळा ठरत होते. शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होऊ नये, यासाठी सचिन यादव यांनी तज्ञ शास्त्रज्ञांच्या मदतीने स्वतःचे संशोधन सुरू केले. त्यातूनच ‘के. बी. बायो ऑरगॅनिक्स प्रा. लि.’ या कंपनीचा जन्म झाला. वनस्पतीजन्य अल्कोलॉइड्सपासून बनवलेली ही जैविक कीटकनाशके आज शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहेत. यामुळे केवळ निर्यातक्षम मालच नव्हे, तर भारतीय ग्राहकांनाही रसायनमुक्त अन्न मिळणे शक्य झाले आहे.
रोजगार आणि विस्तार
केवळ नफा कमावणे हा उद्देश न ठेवता, हाताला काम देणे हे सचिन सरांनी आपले कर्तव्य मानले आहे. आज त्यांच्या कंपन्यांच्या माध्यमातून बारामती, फलटण, पुरंदर, इंदापूर, माण-खटाव या भागातील सुमारे २००० युवक-युवतींना प्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. कंपनीचा विस्तार आज भारतातील १४ प्रमुख राज्यांत झाला असून, इंदोर (मध्य प्रदेश) पाठोपाठ आता राजधानी दिल्लीतही कंपनीचे कार्यालय सुरू होत आहे. भविष्यात ‘१०० एक्स आयुर्वेदा’ या फार्मास्युटिकल कंपनीद्वारे आरोग्य क्षेत्रातही क्रांती करण्याचा त्यांचा मानस आहे.
समाजकार्याची बांधिलकी
सचिन यादव सर हे केवळ यशस्वी उद्योजक नाहीत, तर एक संवेदनशील माणूस आहेत. कोरोना काळात त्यांनी अनेक कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप केले. कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील महापुरात कंपनीच्या वतीने मदतकार्य राबवले. आपल्या कर्मचाऱ्यांना ते कुटुंबाचा भाग मानतात. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या गंभीर प्रश्नांमध्ये, जिथे डॉक्टरही आशा सोडतात, तिथे स्वतःची यंत्रणा कामाला लावून त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले आहेत.
शेतकऱ्यांच्या घामाला दाम आणि तरुणांच्या हाताला काम देणाऱ्या सचिन यादव यांचा हा ‘तेजोमय प्रवास’ कृषी आणि उद्योग क्षेत्रासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
