स्थैर्य, कराड, दि. 14 : घारेवाडी, ता. कराड येथील धुळोबा डोंगर परिसरामध्ये दुतानी डोंगरावर मृतावस्थेतील बिबट्या आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. घारेवाडी गावच्या दक्षिण दिशेला धुळोबा डोंगर आहे. गावातील ग्रामस्थ या भागात जनावरे चरायला घेवून जातात. शनिवारी एकास जनावरे डोंगरातून घरी आणत असताना त्याला दुर्गंधी जाणवली. त्याने बघितले तर बिबट्या मरून पडल्याचे दिसले.
गावचे पोलीस पाटील संदीप व ग्रामपंचायत सदस्य मिलिंद बंडगर यांनी वनविभागाचे रमेश जाधवर यांना फोन करून सांगितले. त्वरित वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बिबट्या 4 दिवसांपूर्वी मृत झाल्याची शक्यता आहे.
बिबट्याचे मृत्यूचे कारण स्पष्ट नाही. रात्री वन कर्मचार्यांनी त्यास डोंगरावरून खाली आणले. बिबट्या पूर्ण वाढ झालेला व अडीच वर्षे वयाचा आहे. सहाय्यक वन संरक्षक किरण कांबळे, वनक्षेत्रपाल विलास काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय हिंगमिरे, रोहन भाटे, वनपाल सुभाष पाटील, वनरक्षक रमेश जाधवर, कविता रासवे, मंगेश वंजारी व वनमजूर उपस्थित होते.