
दैनिक स्थैर्य | दि. 25 जुलै 2025 । फलटण । मंगळवार पेठ भागातील समाज मंदिराच्या परिसरातील एका उंच पिंपळाच्या झाडावर कावळा जातीचा पक्षी चायना मांजेत अडकल्याचा धक्का स्थानिक नागरिकांना बसला. तात्काळ आवाहनानुसार नेचर अँड वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटणच्या स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली. पक्षी अतिशय उंचीत अडकलेला असल्यामुळे बचावासाठी फलटण नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळवण्यात आले. अग्निशमन विभागाच्या दक्षतेमुळे पक्षाला चायना मांजेतून सुरक्षितरीत्या मुक्त करण्यात आले.
पक्ष्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी त्यांनी ताबडतोब केली आणि त्याला कोणतीही गंभीर दुखापत न होता नैसर्गिक वातावरणात सोडण्यात आले. या घटनेतून चायना मांज्यामुळे पक्ष्यांचे जीवन धोक्यात येते, याची आठवण नागरिकांना करून देण्यात आली. त्यामुळे अशा धाग्यांचा वापर टाळावा, असा संदेश संस्थेने दिला आहे.
संस्थेने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर चायना मांजेत अडकलेले कोणतेही पक्षी, प्राणी किंवा वन्यजीव दिसले तर त्यांनी त्वरित नेचर अँड वाइल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी किंवा स्थानिक वनविभागाला संपर्क साधावा. बचावासाठी संपर्क क्रमांक ७५८८५३२०२३ दिला आहे.