
3 लायसन्स रद्द : 89 जणांना अटक : 22 जणांवर गुन्हे
स्थैर्य, सातारा, दि. 24 : लॉकडाऊनमधील नियम तोडत दारू विक्री करणार्या अनुज्ञप्तीधारकांना राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने चांगलाच दणका दिला आहे. या कारवाईत आतापर्यंत 89 जणांना अटक झाली आहे तर 22 जणांवर गुन्हाही दाखल केला आहे. तसेच तीन जणांचे परवाने कायमचे रद्द केले असून एकाचा परवाना 4 महिन्यांसाठी निलंबीत केला आहे.
राज्यात कोव्हीड 19च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही अनुज्ञप्ती धारकाने दुकाने चालू केली तर ते तात्काळ निलंबीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही काही दारूची दुकाने, बार, वाईन शॉप चोरी-छुपके आपला व्यवसाय सुरूच करत होते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उप-आयुक्त (कोल्हापूर) वाय. एम. पवार व सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कारवाईच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार उत्पादन शुल्क (सातारा) अधीक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली 10 भरारी पथके नेमली आहेत. या भरारी पथकांनी नियम मोडणारे सर्व अनुज्ञप्ती सील केल्या आहेत.
या कारवाईत आजपर्यंत अवैध मद्य विक्री करण्याच्या प्रयत्न करणार्यांवर एकुण 172 गुन्हे नोंदवले असून 89 जणांना अटक केलेली आहे. 832.05 लि. हातभटी, 13524 लि. रसायन, 951.32 लि. देशी दारू, 100.07 लि. बीअर, 115 लि. ताडी तसेच 16 वाहने असा एकूण 35 लाख 99 हजारांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच सौ. संगीता भोसले धनगरवाडी, सातारा, रशिद कागदी आर. के. वाईन शॉप, शिरवळ हे तीन अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. सौ. रूक्मिणी कुंभार नाडे पाटण 4 महिन्यासाठी निलंबीत करण्यात आले आहे. तसेच 22 अनुज्ञप्तीवर विभागीय गुन्हे नोंद केले आहे.
उत्पादन शुल्कची दहा पथके कार्यरत
उत्पादन शुल्क विभागाकडून 10 फिरते पथक तयार केली असून ते 24 तास कार्यान्वित आहेत. ही पथके बनावट मद्य विक्री, अवैध मद्यविक्री वाहतुकीवर लक्ष ठेवून आहे. यामुळे परराज्यातून वाहतूक होणार्या अवैध्य मद्यविक्रीला आळा बसला आहे. तसेच जर कोणी अवैध मद्य विक्री करत असेल तर क्रंमाकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.