दैनिक स्थैर्य । दि. ०५ एप्रिल २०२२ । फलटण । सातारा जिल्हा न्यायालयाच्या धर्तीवर फलटण येथे न्यायालयाची सुसज्ज अशी इमारत उभारणार आहे. त्यासोबतच फलटण तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी फलटण येथे सत्र न्यायालय सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची ग्वाही विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील न्यायालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी फलटण बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व फलटण येथील सर्व विधीज्ञ उपस्थित होते. या सोबतच विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.
फलटण न्यायालयीन आवारामध्ये दहा न्यायाधीशांच्या निवासासह पक्षकार, वकील विशेषतः पुरुष व महिला वकील यांना स्वतंत्र व्यवस्था, पक्षकारांना प्रतीक्षालय यासोबतच वकील व पक्षकारांच्या गाड्यांसाठी पार्किंगची सुसज्ज व्यवस्था फलटण न्यायालयीन आवारामध्ये उभारण्यासाठी जिल्हा न्यायालयाच्या धर्तीवर सुसज्ज असा आराखडा तयार करून त्याचा पाठपुरावा आगामी काळामध्ये केला जाईल व फलटण येथे सुसज्ज असे न्यायालय उभारले जाईल, अशी ग्वाही यावेळी विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
सध्याची न्यायालयाची इमारत न्यायालयाला साजेशी नाही. यापूर्वी कोणीही माझ्या सदरील गोष्ट निदर्शनास आणून दिली नाही, याबाबत खंत श्रीमंत रामराजे यांनी यावेळी व्यक्त केली.
फलटण तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी व नागरिकांच्या मागणीनुसार फलटण येथे सत्र न्यायालय सुरू करण्यासाठी आगामी पाठपुरावा आपण सुरू केलेला आहे लवकरात लवकर फलटण येथे सत्र न्यायालय सुरू करण्यात येईल, असेही श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा विशेष सत्कार फलटण वकील संघाच्या वतीने वकील संघाचे अध्यक्ष ॲड. मारुतराव शेडगे यांनी केला.
ॲड. सागर सस्ते, ॲड. महेश पवार, ॲड. आर. वाय.कदम, रणजित जाधव, विश्वजित सस्ते यांनी सदरील कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे नियोजन केले. प्रास्ताविक व आभार ॲड.सागर सस्ते यांनी मानले.