दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२१ । पुणे । कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथील सेसची वसुली बाजार समितीमार्फत थेट खरेदीदारांकडून प्रवेशद्वारावर होण्यासाठी विविध व्यापारी असोसिएशन कडून मागणी करण्यात आली आहे. गेटवर सेस वसुलीबाबत अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापन करुन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.
तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय देशमुख, सचिव संदीप देशमुख, पणन संचालनालयाचे सहसंचालक विनायक कोकरे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक श्री. गरड आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, शेतकरी व ग्राहकांचे हीत लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व टिकले पाहिजे. समितीच्या कामकाजात गैरव्यवहार आणि कामगारांची व शेतकऱ्यांची पिळवणूक होता कामा नये. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अतिक्रमण होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका फिरतांना कुठल्याही प्रकारची अडचण होता कामा नये, अशा सुचना त्यांनी दिल्या.
उपस्थित पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी तसेच आडतिया असोसिएशन आणि पुना मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.