
दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२१ । सातारा । सातारा जिल्हा बॅकेतील आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव राष्ट्रवादीला जिव्हारी लागला आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सायंकाळी येथील शासकीय विश्राम गृहात शशिकांत शिंदे यांच्याशी कमराबंद चर्चा केली. या चर्चेत नक्की काय खलबते झाली? हे मात्र गुलदस्त्यात राहिले.
जावली सोसायटी मतदार संघातून राष्ट्रवादीच्या आमदार शशिकांत शिंदे यांचा बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी एका मताने पराभव केला. या पराभवाची गंभीर दखल राष्ट्रवादीने घेतली. शिंदे समर्थकांनी पराभवाच्या रागात राष्ट्रवादीचे कार्यालय फोडले. मंगळवारी सातारा जिल्हा दौर्यावर असणाऱ्या राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्हा बँक निकालाच्या घडामोडी लक्षात घेता कराडऐवजी सातारा विश्रामगृहात सायंकाळी उशिरा तळ दिला. विश्रामगृहाच्या अजिंक्यतारा दालनात आमदार शशिकांत शिंदे यांनी पवार यांची तत्काळ भेट घेतली. या भेटीत जिल्हा बँकेत झालेल्या पराभवाची कारणमीमांसा व अनेक घडामोडींचा आढावा घेतल्याची चर्चा आहे. शिंदे यांचा पराभव राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना चटका लावून गेला आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी रात्री उशिरा शासकीय विश्राम गृहात येऊन पवारांची भेट घेतली मात्र त्यांच्या चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही.