दैनिक स्थैर्य | दि. २० जानेवारी २०२५ | फलटण |
स्वारगेट-सांगोला बसमधून फलटण एस.टी. स्टँडवर उतरलेल्या लहान मुलीला फलटण शहर पोलिसांनी तपास करून तिच्या पालकांकडे सुखरूप स्वाधीन केले आहे. ही मुलगी रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या फलटण स्टँडवर उतरली होती. या कामगिरीबद्दल फलटण शहर पोलिसांचे अभिनंदन होत आहे.
फलटण एसटी स्टँडवर रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एक लहान मुलगी एसटी स्टँडवर रडताना मिळून आली. तिच्याकडे चौकशी केला असता, तिला तिच्या घरचा नाव पत्ता सांगता येत नव्हता. या मुलीबाबत सीसीटीव्ही फुटेज पाहून शोध घेतला असता, ही मुलगी स्वारगेट-सांगोला या बसमधून उतरल्याचे दिसून आले. या माहितीवरून बस डेपो मॅनेजरमार्फत सांगली बसच्या ड्रायव्हरशी संपर्क साधून एस.टी.मधील मुलीच्या पालकांचा शोध घेतला असता, ती मुलगी प्रकाश गायकवाड (राहणार तुंगत, पंढरपूर) यांची असल्याचे समजले. यावरून पालकांना संपर्क साधून त्यांना नातेपुते येथून परत बोलवून त्या मुलीला सुखरूप त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे, ट्राफिक वॉर्डन आकाश गोळे व ऋतुजा कुदळे यांनी केलेली आहे. या कामगिरीबद्दल फलटण शहर पोलिसांचे कौतुक होत आहे.