
दैनिक स्थैर्य । दि. 02 ऑगस्ट 2025 । फलटण । फलटण नगर परिषदेच्या इतिहासात आज एक सुवर्णपान लिहिले गेले. तब्बल २२ वर्षे नगर परिषदेच्या सफाई विभागात निष्ठेने सेवा बजावणाऱ्या श्रीमती माया यशवंत काकडे यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम एका अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरला. नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. निखिल मोरे यांनी श्रीमती काकडे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना स्वतःच्या मुख्याधिकारी पदाच्या खुर्चीवर बसवून एक अनोखा आणि आदर्श सन्मान दिला.
श्रीमती माया काकडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त नगर परिषदेत एका सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान, मुख्याधिकारी श्री. निखिल मोरे यांनी एक अनपेक्षित आणि मनाला स्पर्शून जाणारा निर्णय घेतला. त्यांनी व्यासपीठावर श्रीमती काकडे यांना बोलावून, स्वतःच्या खुर्चीवरून उठून ती मानाची खुर्ची त्यांना अर्पण केली. एका सफाई कर्मचाऱ्याला मुख्याधिकाऱ्यांच्या आसनावर बसवून केलेला हा सन्मान पाहून उपस्थित सर्वच जण भारावून गेले. टाळ्यांच्या कडकडाटात या अभूतपूर्व निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
नगर परिषदेच्या इतिहासात एका सफाई कर्मचाऱ्याला अशा प्रकारे सर्वोच्च मानाचे स्थान देण्याची ही पहिलीच वेळ होती. मुख्याधिकारी मोरे यांची ही कृती केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या संपूर्ण कामगार वर्गाबद्दलची कृतज्ञता, आदर आणि आपुलकीचे प्रतीक आहे, अशा भावना अनेक उपस्थितांनी व्यक्त केल्या.
या हृदयस्पर्शी सोहळ्याला श्रीमती माया काकडे यांचे कुटुंबीय, ज्यात त्यांचे सुपुत्र श्री. योगेश यशवंत काकडे, सून सौ. पूजा योगेश काकडे आणि नात यशदा यांचा समावेश होता, उपस्थित होते. त्यांच्यासोबतच नगर परिषदेच्या सर्व विभागांचे प्रमुख, अधिकारी, फलटण नगर परिषद म्युनिसिपल कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले.
“एका खुर्चीने इतिहास घडवला आणि एका कर्मचाऱ्याच्या सेवेला योग्य सन्मान दिला,” हे वाक्य फलटण नगर परिषदेत आज खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरले. श्री. निखिल मोरे यांच्या या निर्णयाने समाजात एक सकारात्मक आणि अनुकरणीय आदर्श निर्माण केला आहे.